क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
एफसी गोवाच्या डॅव्हलपमेंटल संघाचा कप्तान आणि संघातील मि. कन्सिस्टंट ही उपाधी मिळविलेला लिएँडर डिकुन्हा हा भविष्यात गोव्याचा एक मोलाचा फुटबॉलपटू म्हणून ओळखला जात आहे. गेल्या फुटबॉल मोसमात एफसी गोवाच्या डॅव्हलपमेंटल संघाच्या राईट-बॅक या महत्वाच्या स्थानावर खेळणारा या 22 वर्षीय खेळाडूने संघाचे कप्तानपद यशस्वीपणे साकारले आहे.
लिएँडर हा संघाचा प्रमुख आधारस्तंभ असून भविष्यातील गोव्याचा स्टार फुटबॉलपटू या नजरेने त्याच्याकडे सध्या पाहिले जाते. मी लहानपणासपासून फुटबॉलपटूच बनण्याचा दृढ निश्चय केला होता. कुटूंबासमवेत मी लहान असताना फुटबॉल सामने पाहायला जात असे, असे लिएँडरने या खेळात आपली कारकिर्द करण्याविषयी सांगितले.
प्रोफेशनल खेळाडू बनण्याच्या बाबतीत आरंभापासूनच योग्य मार्गदर्शन व्हायला पाहिजे. शिरसईतील सेसा फुटबॉल अकादमीत लिएँडरच्या गुणवत्तेवर सुरेख पैलू पाडले गेले. 2012 साली तो सेसा फुटबॉल अकादमीत गेला आणि हाच त्याच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला. अकादमीत तो दोन वर्षे होता. या कालावधीत फुटबॉलच्या व्यतिरिक्त खेळाडूंचा आहार, सराव आणि शिस्त याचे महत्व कळले, असे लिएँडर म्हणाला. प्रोफेशनल फुटबॉलपटू बनण्यासाठी या गोष्टी महत्वाच्या असल्याचे तो म्हणाला.
एफसी गोवाच्या डॅव्हलपमेंटल संघासाठी करार करण्यापूर्वी लिएँडर काही काळ चर्चिल ब्रदर्स स्पोर्ट्स क्लबसाठीही खेळला. एफसी गोवाचा करार मिळाल्यानंतर आपण खुप उत्साहित झालो. मला या खेळात आणखी मोठी मजल मारायची आहे आणि आयएसएल फुटबॉल स्पर्धेत खेळण्याचे आपले स्वप्न असल्याचे लिएँडर म्हणाला.
एफसी गोवाच्या डॅव्हलपमेंटल संघाला खेळताना 22 वर्षीय लिएँडर आपल्या भेदक पासेस आणि ओवरलॅपिंग करण्यासाठी माहिर राहिलेला आहे. त्याचा आक्रमक खेळ आणि एफसी गोवाची आक्रमक खेळण्याची शैलीतही साम्य आहे. एफसी गोवाच्या सीनियर संघातील गोमंतकीय खेळाडू मंदार राव देसाई आणि जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांना लिएँडरचे आदर्श आहेत.
स्पेनचा बार्सिलोना क्लबचा लिएँडर चाहता आहे. गेल्या मोसमाच्या आरंभाला प्रशिक्षक क्लिफर्ड मिरांडाने एफसी गोवाच्या डॅव्हलपमेंटल संघाच्या कप्तानपदाची जबाबदारी माझ्याकडे दिली, तो क्षण आपण कदापी विसरणार नाही, असे लिएँडरने सांगितले. आपण मंदार राव देसाई व सॅरिटॉन फर्नांडिस यांच्याकडून सल्ला घेतो. खडतर मेहनतीवर ते नेहमीच भर देतात आणि मी सुद्धा नेहमीच खेळात सुधारणा आणि परिश्रमासाठी तयार असतो, असे लिएँडर म्हणाला.
एफसी गोवाच्या सीनियर संघात स्थान आणि देशाचे प्रतिनिधीत्व करण्याचे उद्दिष्टय़ मी ठेवले आहे. एफसी गोवा संघाला उच्च शिखरावर न्यायचं आहे. असे तो शेवटी म्हणाला.