ऑनलाईन टीम / लंडन :
ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली मानवी चाचणी यशस्वी झाली आहे. या लसीमुळे रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढून, त्याला कोरोना संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत होत असल्याचा निष्कर्ष संशोधकांनी नोंदवला आहे.
‘द लान्सेट’ या जगप्रसिद्ध मासिकात या कोविड चाचणीचे निष्कर्ष प्रकाशित करण्यात आले आहेत. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आवश्यक ती रोगप्रतिबंधक शक्ती शरीरामध्ये विकसित करण्यात ऑक्सफर्डची लस यशस्वी ठरली आहे. या कोरोना लसीचे दोन सकारात्मक परिणाम समोर आलेले आहेत. या लसीला इम्युन सिस्टिम मजबूत करण्यात यश आलेले आहे. तसेच मानवी शरीरातील टी सेल्सच्या निर्मितीत वाढ होत असल्याचे आढळून आले आहे. विषाणूंनी ग्रासलेल्या दुषित पेशी नष्ट करण्यात या टी सेल्सचा महत्वाचा वाटा असतो.
विद्यापीठाकडून एप्रिल महिन्यात 1 हजार 77 स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली. या सर्व स्वयंसेवकांच्या शरीरात कोरोनाशी यशस्वीपणे लढणार्या आणि कोरोनाला मात देणार्या अँटिबॉडी विकसित झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर या लसीच्या मानवी चाचणीचे अजूनही काही टप्पे बाकी आहेत. तरी देखील ब्रिटन सरकार या 10 कोटी लस बनवून घेणार आहे. त्यासाठी बायोएनटेक, फायझर आणि वालनेवा फार्मा या तीन कंपन्यांशी करार करण्यात आला आहे.