नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात दिवसागणिक ओमिक्रॉनबाधितांचा आकडा वाढत असल्याने चिंता वाढली आहे. देशात आतापर्यंत कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचे 360 रुग्ण आढळून आले आहेत. एकूण ओमिक्रॉन बाधितांपैकी 316 रुग्ण केवळ 9 राज्यात आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 88 रुग्ण असून दिल्लीत 67, तेलंगणा 38, तामिळनाडू 34, कर्नाटक 31, गुजरात 30, राजस्थान 22 अशी बाधितांची संख्या आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 77 हजार 516 इतकी आहे. देशात गेल्या 24 तासात 6 हजार 650 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 374 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचदरम्यान देशात 7,051 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 42 लाख 15 हजार 977 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना महामारीमुळे जीव गमावलेल्यांची संख्या वाढून 4 लाख 79 हजार 133 वर पोहोचली आहे.
आतापर्यंत 140 कोटींहून अधिक डोस
देशव्यापी लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीच्या 140 कोटींहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. गुरुवारी 57 लाख 44 हजार 652 डोस देण्यात आले आहेत. देशात आतापर्यंत कोरोना लसीचे 140 कोटी 31 लाख 63 हजार 63 डोस देण्यात आले आहेत.