साडेआठ लाखाच्या मुद्देमालासह गुजरातच्या युवकाला अटक
प्रतिनिधी / बेळगाव
ग्राम पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अबकारी विभागाने तपासणी वाढविली आहे. बेकायदा व गावठी दारू थोपविण्यासाठी महाराष्ट्र व गोव्याच्या सीमेवर चेकपोस्ट उभे करून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. बुधवारी कणकुंबीजवळ ट्रकसह साडेआठ लाखांचा गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी गुजरातमधील एका युवकाला अटक करण्यात आली आहे. अबकारी निरीक्षक मंजुनाथ गलगली व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली. रितेशभाई सोमाभाई पटेल (वय 37, रा. राणीफ, जि. अहमदाबाद, गुजरात) असे त्याचे नाव आहे. एमएच 46 बीएफ 8240 क्रमांकाच्या गुड्स कॅरीअरमधून बेकायदा दारूची वाहतूक करताना ही कारवाई करण्यात आली आहे.
या सहा चाकी वाहनामध्ये दारू वाहतूक करण्यासाठी पार्टीशन करण्यात आले होते. अधिकाऱयांनी एकूण 125 बॉक्स गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. 1087.200 लिटर दारूसाठा जप्त केला असून वाहनांसह त्याची किंमत 8 लाख 59 हजार इतकी होते.
सध्या रितेशभाईवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. वाहन मालकाचाही शोध घेण्यात येत असून त्याला अटक करण्यासाठी धडपड सुरू आहे. अबकारी विभागाचे संयुक्त आयुक्त डॉ. वाय. मंजुनाथ, उपायुक्त जयरामेगौडा, उपअधीक्षक चनगौडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंजुनाथ गलगली, अबकारी निरीक्षक एस. एम. पुजार, बी. ए. पांगेरी, सुनील पाटील, एम. एफ. कटगेण्णावर, बी. एस. अटीगल आदींनी ही कारवाई केली आहे.