कणबर्गी :स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱया बेळगाव शहराला खड्डय़ांचे ग्रहण लागले आहे. खड्डय़ात रस्ता आहे की, रस्त्यामध्ये खड्डा असा मुद्दा सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. कणबर्गी येथील हिंडाल्को रोड साई मंदिरसमोर रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.
गेल्या सहा महिन्याहून अधिक काळ या ठिकाणी खड्डय़ांचे साम्राज्य वाढले आहे. जवळपास पाच ते सहा इंचाचे खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येथून ये-जा करणाऱया वाहनधारक व पादचाऱयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात दुचाकीस्वारांचे अपघात घडत आहेत. रात्रीच्यावेळी खड्डय़ांचा अंदाज येत नसल्याने दुचाकी स्लीप होऊन अपघात होत आहेत. त्यामुळे या ठिकाणाहून जीव मुठीत घेऊन प्रत्येकाला प्रवास करावा लागत आहे. सदर रस्त्यावरून वर्दळ अधिक असल्याने डोकेदुखी वाढली आहे. विद्यार्थी, कामगार व मंदिराला येणाऱया भाविकांची मोठय़ा प्रमाणात येथून ये-जा असल्याने अडचणी वाढल्या आहेत. तरी या भागाला कोण वाली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कोणताही अनर्थ घडण्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करावी व वाहनधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.