प्रतिनिधी / दापोली :
कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेडिंग करणाऱया गुंतवणूकदारांची चांगलीच ‘चांदी’ झाली आहे. कमोडिटी मार्केटमध्ये भारतीय मूल्यात चांदी 55 हजाराच्या वर जाऊन पोहोचल्याने चांदीमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार ‘मालामाल’ झाले आहेत.
संपूर्ण जगभरात चांदीचे ‘पांढरे सोने’ म्हणजे ‘व्हाईट गोल्ड’ म्हणून ओळखले जाते. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे देशांतर्गत आयात व निर्यात बंद आहे. विमान वाहतूक सेवा, कार्गो सेवा व जलवाहतूकही बंद असल्यामुळे चांदी या मौल्यवान धातूची आयात-निर्यातही पूर्णपणे ठप्प झाली आहे. ज्या देशांकडे एवढय़ा मूल्याचे सोने व चांदी आहे, त्यांचीच खरेदी-विक्री सध्या सुरू आहे. सध्या जागतिक स्तरावर व भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे देश-विदेशातील विमानसेवा व अन्य वाहतूक सेवा कधी सुरू होईल, याचा काही अंदाज नाही. त्यात चांदीला मागणी वाढत असल्यामुळे व पुरवठा ठप्प असल्यामुळे चांदीच्या किंमती वाढत आहेत.
सोमवारी रात्री कमोडिटी मार्केट बंद होताना 54 हजार रुपयांच्या आसपास असणारी चांदी मंगळवारी सकाळी मार्केट सुरू होताच 55 हजारांवर जाऊन ओपन झाली. 2016 नंतर हा भाव प्रथमच लोकांना पहायला मिळाला. अमेरिका मार्केटमध्ये चांदी 20 डॉलर औसच्यावर पोहोचल्याने भारतीय मार्केटमध्ये ती 55 हजारांच्यावर जाऊन पोहोचली आहे. चांदीला कमोडिटी मार्केटमध्ये 56 हजारांचे अप्पर सर्कीट असून हे सर्कीट तोडले तर चांदीचा भाव 60 हजारांवर जाऊन पोहोचेल, असा अंदाज सोन्या-चांदीच्या व्यापाऱयांकडून वर्तवण्यात येत आहे. तसेच लॉकडाऊन आणखीन लांबले तरीही चांदीच्या भावात येत्या काही काळात आणखी वाढ पहायला मिळेल व चांदीमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार आणखी मालामाल होतील, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे सर्व कामधंदे, नोकऱया ठप्प झाल्या असल्या तरी कमोडीटी मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱयांना चांदीने हात दिला असल्यामुळे कोरोनाच्या काळात कमोडीटी मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱयांची चांगलीच ‘चांदी’ झालेली पहायला मिळत आहे.