वार्ताहर/ कराड
कराड शहर व परिसरात बुधवारी सकाळी सुरू झालेला मुसळधार पाऊस गुरूवारी सकाळपर्यंत बरसल्याने परिसर जलमय झाला आहे. 24 तासात कराडला 100 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सलग सुरू असलेला पाऊस व कोयना धरणातून सुरू असलेला विसर्ग यामुळे कृष्णा-कोयना नद्यांच्या पाणीपतळीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. दोन्ही नद्या दुथडी वाहात असून कृष्णा घाटाच्या पायऱयांना पाणी लागले आहे. गुरूवारी सकाळी सातनंतर पावसाने उसंत घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
बुधवारी सकाळपासूनच शहर व परीसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. दिवसभर पावसाची संततधार सुरू राहिल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढल्याने शहरातील अनेक इमारतींच्या तळमजल्यात पाणी भरले होते. तर पुणे-बेंगलोर महामार्गावर गोटे येथे सेवारस्त्यावर आलेल्या पाण्यात एक कार बुडाली आहे. तर विद्यानगर येथे महामार्गावर पाणी आल्याने या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली. खोडशी येथील ब्रिटीशकालिन बंधारा ओसंडून वाहात आहे.
कृष्णा-कोयना नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. तर कोयना धरणातून विसर्ग सुरू असल्याने कृष्णा व कोयना नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. कृष्णा घाटाच्या पायऱयांना पाणी लागले आहे. मंगळवार पेठेतील नदीकाठी असलेल्या कोविड स्मशानभूमीलाही पाणी लागले आहे. सलग 24 तासाहून अधिक काळ पाऊस पडल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुधवारी दिवसभर शहरातील मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट दिसत होता. तर गुरूवारी बाजारचा दिवस असतानाही बाजारपेठेसह मंडई परिसरात तुरळक गर्दी दिसत होती. वाखाण परीसरातील शेतीसह तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तहसील कार्यालयाकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कराड तालुक्यातील मंडलनिहाय पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे, कराड-105 मिमी, मलकापूर-103, सैदापुर-105, कोपर्डे-110, मसूर-85, उंब्रज-90, शेणोली-104, कवठे-90, काले-113, कोळे-115, उंडाळे-102, इंदोली-85 मिमी.