बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात वाढत्या कोरोना प्रकरणामुळे आणि दक्षिण आफ्रिकेतील विषाणूचा पहिला रुग्ण सापडल्याने प्रशासनाची चिंता वाढली होती. दरम्यान त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे. दरम्यान सर्व व्यक्तींना खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना अलग ठेवण्यात आले आहे.
बुधवारी आरोग्य विभागाने जरी केलेल्या बुलेटिनमध्ये एका व्यक्तीला कोरोना दक्षिण आफ्रिकेच्या विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट केले. गुरुवारी, हा रुग्ण शिवमोगा येथील असल्याचे समजले. काही काळापूर्वी तो दुबईहून घरी परतला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, तो व्यक्ती फेब्रुवारीच्या तिसर्या आठवड्यात दुबईहून बेंगळूर येथे आला होता. त्यानंतर तो शिवमोगा येथे गेला. नंतर त्याला कोरोना संसर्ग झाल्याची पुष्टी झाली. परंतु ७ मार्च रोजी त्याला दक्षिण आफ्रिकेतील विषाणूचा संसर्ग झाल्याचे समजले. दरम्यान १० मार्च रोजी आरोग्य विभागाने बुलेटिनमध्येही माहिती दिली आहे.
दरम्यान, शिवमोग्याचे आरोग्य अधिकारी डॉ. राजेश एच. यांनी सांगितले की, त्या रुग्णाच्या प्रथम संपर्कात आलेल्या आणि त्यांच्या दुय्यम संपर्कांची ओळख पटली असून त्या सर्वांचे नमुनेही तपासणीसाठी पाठविले आहेत. संक्रमित व्यक्तीची पत्नी आणि मुलगा यांच्यासह कुटुंबातील तीन सदस्यांसह संपर्कात आलेल्या सर्व ३९ जणांचे नमुने चाचणी अहवालात आले आहेत. संक्रमित व्यक्तीचा अहवालही नकारात्मक आहे. तथापि, खबरदारीचा उपाय म्हणून त्याला आणि कुटुंबातील सदस्यांना संस्थात्मक अलग ठेवण्यात आले आहे. डॉ. राजेश यांनी संक्रमित व्यक्ती दक्षिण आफ्रिकेत कधीच गेला नव्हता. तो दुबईतील एका हॉटेलमध्ये काम करायचा आणि तेथे त्याला संसर्ग झाल्याची शक्यता आहे. दरम्यान जिल्ह्यातील जनतेने काळजी करण्याची गरज नाही. परिस्थिती नियंत्रणात आहे, असे म्हंटले आहे.