बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक राज्य सरकारने दिवाळी (दिपावली) हंगामाच्या अगोदर १ ते १७ नोव्हेंबर या काळात फटाके विक्रीस परवानगी दिली आहे. याशिवाय कोरोना प्रसार होऊ नये यासाठी अनेक मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे निर्देश विक्रेत्यांना, ग्राहकांना व स्थानिक प्रशासनांना दिले आहेत.
राज्याचे मुख्य सचिव टी. एम. विजय भास्कर यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार विक्रेत्यांना अन्य व्यावसायिक व निवासी जागेवरून दूर ठिकाणी फटाके व इतर वस्तू विक्रीस परवानगी असेल. संबंधित कार्यालयांकडून आवश्यक परवाना मिळालेल्या अधिकृत व्यापाऱ्यांनाच दुकाने सुरू करण्याची मुभा देण्यात येईल. प्रत्येक दुकानात क्रॉस-वेंटिलेशन सुविधा असणे आवश्यक आहे आणि संबंधित प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेला परवाना प्रदर्शित केला पाहिजे, असे मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले आहे.