बेंगळूर \ ऑनलाईन टीम
कर्नाटकमधील चमराजनगरमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयात 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. जिल्हा प्रशासानानं रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता असल्याचं मान्य केलंय, मात्र हे मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं नाहीत, तर रुग्णांची तब्येत बिघडल्यामुळं झाले, असं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
आम्ही रुग्णांच्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करीत असल्याचे मंत्री सुरेश कुमार यांनी सांगितले आहे. या अहवालानंतरच या रूग्णांच्या मृत्यूचे कारण समोर येईल असे त्यांनी म्हटले आहे. तसेच घटनेची चौकशी करण्याचे आदेश देखील त्यांच्याकडून देण्यात आले आहेत.
या घटनेनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांनी उद्या मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या घटनेची विरोधी पक्ष काँग्रेसने हा मुद्दा लावून धरत येदियुरप्पा यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच कोरोना संकट रोखण्यासाठी सरकारकडे कोणताच प्लान नाहीये, असं म्हणत काँग्रेसनं आरोप केले आहेत.