रायबरेली
काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या रायबरेली या लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार राकेश सिंग यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे प्रचंड कौतुक केले आहे. योगींसारखा प्रामाणिक मुख्यमंत्री कधीच पाहिला नव्हता असे उद्गार हरचंदपूरचे काँग्रेस आमदार असलेल्या सिंग यांनी काढले आहेत. योगींसारखा प्रामाणिक आणि पूजनीय मुख्यमंत्री कुठल्याच राज्यात नसेल. लोक त्यांची देवाप्रमाणे पूजा करतात. आम आदमी पक्षाच्या आमदाराने योगींवर टीका करताना आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी. सोमनाथ भारती यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालविण्यात यावा अशी मागणी काँग्रेस नेते राकेश सिंग यांनी केली आहे. रायबरेलीचे आमदार दिनेश प्रताप सिंग सध्या भाजपमध्ये आहेत. तर त्यांचे कनिष्ठ बंधू राकेश सिंग काँग्रेस पक्षात आहेत.