भाजप विरोधात आक्रमक प्रचार करण्याचा सल्ला
प्रतिनिधी/ मडगाव
लुईझिन फालेरो हे काँग्रेस पक्षात मोठे झाले. मात्र, त्यांनीच काँग्रेस पक्षाचा विश्वासघात केला व त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याचे पडसाद काल शनिवारी काँग्रेस पक्षाच्या समन्वय समितीच्या बैठकीत उमटले. काँग्रेस पक्षात आणखीन बंडखोर असल्यास त्यांचा आताच शोध घ्या व त्यांना गट समितीतून बाहेर काढा, असा आदेश पी. चिदंबरम यांनी दिला.
मडगावात एका हॉटेलात काँग्रेस पक्षाच्या समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकीला पी. चिदंबरम, गोवा प्रभारी दिनेश गुडूरांव, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, खासदार फ्रान्सिस सार्दिन, प्रचार प्रमुख तथा आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, माजी खासदार एदुआर्द फालेरो, कार्याध्यक्ष आलेक्स सिक्वेरा, संगीता परब, एल्विस गोम्स, एम. के. शेख, मार्था साल्ढाना, गोवा निरीक्षक प्रकाश रोठोड, मन्सूर खान इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
लुईझिन फालेरो यांनी काँग्रेस पक्ष सोडणे हे पक्षासाठी हानिकारक होते. त्यांनी तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने ते मतांची विभागणी करण्यासाठी प्रयत्न करतील. त्याचा लाभ भाजपला होऊ शकतो. त्यामुळे गोव्यात केवळ काँग्रेस पक्षच भाजपला हटविण्यास सक्षम असल्याचे आता काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी लोकांना पटवून द्यावे लागणार असल्याचे काँग्रेस पक्षाचे गोवा निवडणूक प्रमुख पी. चिदंबरम म्हणाले.
सरकारच्या भ्रष्ट कारभाराची माहिती द्या
काँग्रेस पक्षाने गोव्यात भाजप सरकारच्या विरोधात आघाडी उघडावी, त्यात वाढती महागाई, पेट्रोल-डिझेल, गॅस सिलिंडर, सरकारी नोकर भरतीत चाललेला गोंधळ, कोविडच्या काळात जनतेला झालेले त्रास इत्यादी विषयावर अधिक भर द्यावा, असे चिदंबरम यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. भाजपला उघडे पाडण्याची एकही संधी सोडू नका, घरोन घरी भेट देऊन सरकारच्या भ्रष्ट कारभाराची माहिती देण्याची सूचना त्यांनी केली.
2017 मधील सर्व जागा पुन्हा जिंकण्याचा निर्धार
काँग्रेस पक्षाने 2017च्या निवडणुकीत ज्या मतदारसंघातून विजय मिळविला होता, त्याच मतदारसंघातून पुन्हा विजय मिळविण्याबरोबरच 23-26 मतदारसंघात जिंकण्याची तयारी केली असल्याची माहिती गिरीश चोडणकर यांनी दिली. ज्यांनी काँग्रेस पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून स्वतःचा स्वार्थ साधला त्या सर्वांना या निवडणुकीत धडा शिकविला जाईल. काँग्रेस पक्षाने सध्या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रचार सुरू केला आहे. गोव्यात ज्यांना चांगले सरकार हवे असेल तसेच सांप्रदायिक शक्तीला विरोध करायचा असेल त्यांनी काँग्रेस पक्षात येण्याचे आवाहन त्यांनी केले.
या समन्वय समितीच्या बैठकीत लोकांशी संपर्क साधून त्यांच्या पसंतीचा जाहीरनामा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षांतराच्या व्हायरपासून गोव्याचा बचाव करण्यासाठी अधिक प्रभावीपणे पावले टाकण्यात येतील. मतदारांनीसुद्धा पक्षांतराच्या व्हायरसला दूर ठेवण्याचे आवाहन श्री. चोडणकर यांनी केले.
पी. चिदंबरम हे तीन दिवसांच्या गोवा भेटीवर असून काल शनिवारी त्यांनी काणकोण व वेळळी येथील काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आज रविवारी ते बाणावलीतील कार्यकर्त्यांना भेटतील.