प्रतिनिधी/ गगनबावडा
कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्र्वभूमीवर सोशल डिस्टंसचा धोका होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून २८ व २९ डिसेंबर रोजी होणारा मर्द किल्ले गगनगडावरील दत्त जयंती सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. गगनबावडा तहसिल कार्यालयात तहसिलदार संगमेश कोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
लाखो भाविकांच्या उपस्थितीत मर्द किल्ले गगनगडावर दत्तजयंती सोहळा साजरा केला जातो. विश्वगौरव पुरस्कार प्राप्त परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या भूमिवर या दिवशी भाऊगर्दी असते. पुढील आठवड्यात २८ व २९ डिसेंबर रोजी हा सोहळा संपन्न होणार होता.
कोरोना रोगाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत दत्त जन्मकाळ साजरा होणार आहे. या दोन दिवशी भाविकांना दर्शन,प्रवेश बंदी केली आहे. या बैठकिस ट्रस्टी रमेश माने,व्यवस्थापक संजय सिंह पाटणकर, गटविकास अधिकारी शरद भोसले, नंदकूमार पोवार,पोलिस उपनिरीक्षक संगीता पाटील, ग्रामसेवक आर.बी.कुरणे , वैद्यकिय अधिकारी डॉ.विशाल चोकाककर इत्यादी उपस्थित होते.