वार्ताहार / कुंभोज
कुंभोज ते दानोळी रस्त्यावरील माळी मळ्याजवळील वस्तीवर एका परप्रांतीय तरुणास कोरोनाची लागण झाल्याचे काल रात्री उशिरा निष्पन्न झाले. कोरोनाबाधित कुंभोज येथे बहिणीच्या घरी गेल्या सहा महिन्यांपासून वास्तव्यास आहे. कुंभोजात कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याची बातमी कुंभोज गावात पसरताच नागरिकांत घबराट पसरली. कोरोनाबाधिताच्या घरातील अकरा जणांना घोडावत येथील अलगीकरण केद्रात क्वारंटाईन करणेत येणार असल्याची माहिती सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल शिखरे यांनी दिली. गावात आजपासून लॉकडाऊन करणेत येणार असल्याचे ग्रामपंचायतीने जाहीर केले आहे.
कोरोनाबाधित तरुणाची सांगली येथील खासगी दवाखान्यात पाच दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली आहे. त्यादरम्यान त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. तथापि या तरुणाचा आजचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सदरची माहिती कुंभोज गावात समजताच नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामपंचायतीने प्रतिबंधात्मक उपाययोजनेतंर्गत आजपासून लॉकडाऊन करणेत येणार असल्याचे जाहीर केले. बाधित तरुणाच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्याचे काम आरोग्य विभागाच्यावतीने रात्री उशिरापर्यंत सुरू होते.