सहा महिन्यांपासून मार्ग बंद : फाटक न उघडल्यास आंदोलन करण्याचा इशारा
वार्ताहर / कुडची
येथील रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरण कामामुळे जुने फाटक हटविताना नव्या फाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. असे असतानाही सदर फाटक अद्याप बंदच ठेवण्यात आले आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱया नागरिकांना फेरा मारून जावे लागत आहे. यामुळे पैशासह वेळेचा अपव्यय होत आहे. याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने सदर फाटक वाहतुकीस खुले करावे. अन्यथा रेल्वे रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.
येथील रेल्वे फाटक बंद असल्याने कुडचीसह गुंडवाड, शिरगूर आदी गावातील नागरिकांना फेरा मारून निश्चित स्थळ गाठावे लागत आहे. गत सहा महिन्यांपूर्वी येथील जुने रेल्वे फाटक दुहेरीमार्ग कामामुळे हटविले होते. यामुळे नागरिकांना मार्गक्रमण करणे अडचणीचे बनले होते. यातच लॉकडाऊन झाल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. नवे फाटक त्वरित निर्माण करण्यासाठी रेल्वे अधिकारी व स्टेशन मास्तरांना निवेदन देण्यात आले होते. यानंतर सदर फाटकाचे काम पूर्ण झाले. मात्र अद्याप सदर फाटक वाहतुकीस खुले करण्यात आले नाही. त्यामुळे एक ते दीड कि. मी. चा फेरा मारुन नागरिकांना जावे लागत आहे. तसेच येथील मार्ग एकेरी असल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने रेल्वे फाटक सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
अन्यथा कारवाई करणार
रेल्वे फाटक बंद असल्याने शिरगुर, गुंडवाडसह परिसरातील नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. याबाबत अनेक निवेदने देण्यात आली. काम पूर्ण होण्यासाठी रेल्वेरोकोचा इशारा दिल्याने ठेकेदाराने काम पूर्ण केले. दरम्यान सदर फाटक तत्काळ खुले न केल्यास ठेकेदार व अधिकाऱयांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल, असा इशारा कुडची रेल्वे सुधारणा समितीचे सदस्य इकबाल कोले यांनी दिला.