ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या कुलगाम परिसरात रविवारी रात्री उशिरा भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले. भारतीय लष्कराचे एक मेजर या चकमकीत जखमी झाले आहेत.
रविवारी सायंकाळी अस्थल आणि चेहलान परिसरात राष्ट्रीय रायफल्सचे जवान गस्त घालत होते. दरम्यान, लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी अचानकपणे जवानांवर गोळीबार केला. भारतीय जवानांनी तात्काळ हल्ल्याला प्रत्युत्तर दिले. त्यावेळी पोलिसांचे विशेष कृती दल पथकही त्याठिकाणी मदतीला आले. दोन्ही पथकांना रात्री उशीरापर्यंत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले.
चकमकीदरम्यान पळून गेलेले दहशतवादी कुलगामच्या लोवरमुंडा परिसरात लपून बसले आहेत. भारतीय जवानांनी या परिसराला घेराव घातला असून, दोन्हीकडून गोळीबार सुरू आहे.