प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे प्रतिपादन
वार्ताहर /पालये
हरमल पंचक्रोशी शिक्षण संस्था केवळ हरमल गावापुरती मर्यादित नाही. तर आजूबाजूच्या गावातल्या मुलांनांही ज्ञानसंपन्न बनविण्यासाठी निर्माण झालेली आहे. या संस्थेत पालये गावातील 7-8 शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी सेवेत आहेत. खडतर परिस्थितीत ही संस्था यशोशिखरावर विराजमान झालेली आहे. 50 वर्षांचा टप्पा पार करून ही संस्था दिमाखाने वाटचाल करीत आहे. केजी ते पीजीपर्यंत शिक्षण देण्यास समर्थ असणारी ही परिसरातील एकमेव संस्था आहे, असे प्रतिपादन हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केले.
मधलावाडा-पालये येथील 67 व्या सरस्वती पूजन महोत्सवात निमंत्रित विविध मंडळाचा दांडिया कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सन्माननीय अतिथी म्हणून जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर, सरपंच उदय गवंडी, पालये ग्रामपंचायतीचे सदस्य संदीप न्हानजी, प्रगतीशील शेतकरी लक्ष्मण ऊर्फ भाला तिळवे, कमलाकांत वसंत परब, कोरगाव पंचायतीचे पंचसदस्य महादेव ऊर्फ न्हानू मंगेश पालयेकर, श्री भूमिका वेताळ देवस्थान समितीचे अध्यक्ष एकनाथ तुकाराम परब, आयोजन समितीचे अध्यक्ष अनिल परब, उपसचिव वासुदेव रामा परब, उपमुखत्यार नारायण परब यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुये डॉन बॉस्को हायस्कूलचे निवृत्त शिक्षक प्रकाश परब यांनी केले. त्यांनीच मान्यवरांचा परिचय करून दिला. प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या शैक्षणिक क्षेत्रात बजाविलेल्या कामगिरीचा आढावा घेतला. माळरानावर शैक्षणिक संकुल सर्वसुविधायुक्त टोलेजंग उभारण्याचे श्रेय त्यांना जाते. आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातही कैद्यानांही शिक्षण मिळावे म्हणून इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाचे वर्ग कोलवाळच्या तुरुंगामध्येसुद्धा त्यांनी सुरू केले. बारावी सायन्सनंतर गोवा मेडीकल कॉलेजमध्ये फिजिओथेरपी सारखे विविध नवी डिप्लोमा कोर्सेस त्यांनी सुरू केले. असे हे व्यक्तिमत्त्व खऱया अर्थाने ‘शिक्षण सम्राट’ आहेत, असे प्रतिपादन प्रकाश परब यांनी केले.
आपल्या बहुमानाने मी अगदी भारावून गेलो आहे. मला आणखी काम करण्याची प्रेरणा लाभलेली आहे, असे प्रतिपादन प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पुढे आपल्या भाषणात केले.
संस्कृतीप्रधान कार्यक्रमांचे आयोजन करून भारतीय संस्कृती जतन करण्याची मेलाची कामगिरी हे सरस्वती मंडळ करीत असून मंडळाचे हे कार्य कौतुकास पात्र ठरत आहे, असे प्रतिपादन जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशांवकर यांनी केले.
राजकीय क्षेत्रात पार्सेकर सरांची उणीव भासते. ती उणीव भरून काढण्यासाठी पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात चमकण्यासाठी पार्सेकर सरांना सर्वांनी पाठिंबा द्यावा. त्यासाठी कामाला लागूया, असे सरपंच उदय गवंडी म्हणाले.
दरम्यान, या कार्यक्रमात शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन प्रा. पार्सेकर यांचा श्री भूमिका वेताळ देवस्थान समितीचे अध्यक्ष एकनाथ तुकाराम परब यांच्या हस्ते बहुमान करण्यात आला.
दरम्यान, या कार्यक्रमात एकूण सहा निमंत्रित दांडिया पथकाने दांडिया-गरबा नृत्य सादर केले. यात बाराजण दांडिया मंडळ भंडारवाडा-पालये, देवी भगवती दांडिया मंडळ तुये, सनशाईन दांडिया मंडळ धारगळ, स्वामी समर्थ दांडिया मंडळ शिवोली, भूमिका दांडिया मंडळ सावंतवाडा-मांद्रे, महादेव सातेरी मंडळ कासारवर्णे या पथकांचा सहभाग होता. हा कार्यक्रम जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर, सरपंच उदय गवंडी, पंचायतसदस्य संदीप न्हानजी, प्रगतीशील शेतकरी लक्ष्मण ऊर्फ भाला तिळवे, कमलाकांत वसंत परब, संजय परब (मधलावाडा-पालये) यांनी पुरस्कृत केला होता. आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली