मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी बँक हिमालयासारखी उभी, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा दिलासा
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मृत कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना अनुकंपा अंतर्गत नोकरीची नियुक्ती पत्रे व विमा धनादेशांचे वाटप झाले. बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या मासिक बैठकीमध्ये मंत्री मुश्रीफ यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विमा धनादेश व नियुक्ती पत्रांचे वाटप झाले.
यावेळी बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, कोरोनाच्या जागतिक महाभयानक महामारीतही केडीसीसी बँकेने ग्राहकांना तत्पर सेवा अखंडपणे दिलेली आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कर्मचाऱ्यांनी ग्राहकसेवा केली आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी बँक हिमालयासारखी उभी आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, केडीसीसी बँकेच्या कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास बँकेने २१ लाख रुपये विमासुरक्षा कवच व संबंधित कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी कल्याण निधीमार्फत दोन लाखाच्या विमा सुरक्षेची तरतूद केलेली आहे.