प्रतिनिधी/ खेड
कोकण मार्गावरून धावणाऱया मुंबई-मडगाव मांडवी एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये मंगळवारी सकाळी 11.35 च्या सुमारास वीर रेल्वेस्थानकानजीक अचानक बिघाड झाला. यामुळे प्रवाशांची 2 तास रखडपट्टी झाली. करंजाडी येथून मालगाडीचे इंजिन जोडल्यानंतर मांडवी एक्सप्रेस मडगावच्या दिशेने रवाना झाली.
10103 क्रमांकाची मुंबई-मडगाव मांडवी एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून मंगळवारी सकाळच्या सुमारास सुटली. ही एक्सप्रेस वीर स्थानकानजीक आल्यानंतर इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे लोकोपायलटच्या निदर्शनास येताच स्थानकातच थांबा देण्यात आला. बराच वेळ ही एक्सप्रेस स्थानकात थांबूनही प्रवाशांना इंजिन बिघाडाबाबत कुठलीच कल्पना न दिल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
अखेर करंजाडीतून मालगाडीचे इंजिन मागवले
सलग 2 तास प्रवाशांची वीर स्थानकातच रखडपट्टी झाली. अखेर करंजाडी येथून मालगाडीचे इंजिन मागवण्यात आले. दुपारी 1 च्या सुमारास मालगाडीचे इंजिन जोडल्यानंतर मांडवी एक्सप्रेस गोव्याच्या दिशेने रवाना झाली. गोव्याच्या दिशेने जाणाऱया अनेक प्रवाशांचाही त्या-त्या स्थानकात खोळंबा झाला.