दिवसभर बघ्यांची गर्दी आणि सेल्फी घेण्यासाठी रीघ
प्रतिनिधी / वाकरे
मंगळवारी सकाळी सव्वा दहाची वेळ,आकाशात हेलिकॉप्टर घिरट्या मारत होते, हेलिकॉप्टरच्या सेन्सरचा तांत्रिक बिघाड झाला होते, भरकटलेले हेलिकॉप्टर कुडीत्रे, कोपार्डे परिसरात घिरट्या घालत होते, अखेर पायलटने सुरक्षित जागा पाहून सांगरूळ फाटा, कोपार्डे (ता. करवीर) येथील स.ब.खाडे महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर हेलिकॉप्टर उतरवले,त्यामुळे पुढील अनर्थ टळला.मात्र हेलिकॉप्टर उतरल्याची बातमी परिसरात पसरल्याने बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती.
याबाबत सविस्तर माहिती अशी की मंगळवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास सांगरूळ फाटा, कोपार्डे परिसरात आकाशात एक हेलिकॉप्टर घिरट्या घालत असल्याचे सर्वांच्या निदर्शनास आले. जमिनीपासून हेलिकॉप्टर कमी उंचीवर होते. यातून एखादी महनीय व्यक्ती प्रवास करत असणार असा सर्वांचा अंदाज होता,मात्र तो फोल ठरला.सदरचे हेलिकॉप्टर काही मिनिटे कुंभी कासारी कारखान्याकडे वळले, त्यानंतर पुन्हा ते हेलिकॉप्टर सांगरुळ फाटा परिसरात घिरट्या घालू लागले. अखेर या हेलीकॉप्टरच्या पायलटला स.ब. खाडे महाविद्यालयाच्या क्रीडांगणावरील प्रशस्त रिकामी जागा निदर्शनास आली. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने त्यांनी हेलिकॉप्टर क्रीडांगणावर उतरवले. सुदैवाने शाळेची वेळ साडे अकराची असल्याने क्रीडांगणावर विद्यार्थी नव्हते. यावेळी कॉलेजच्या आवारात धुळीचे प्रचंड लोळ पसरले होते, त्यामुळे कॉलेजच्या सर्व इमारती धुळीने माखून गेल्या.हेलिपॅड नसतानाही पायलटने सुरक्षितपणे हेलिकॉप्टर जमिनीवर लँड केले,आणि पुढील अनर्थ टळला.
या हेलिकॉप्टरबाबत मिळालेली माहिती अशी की पुणे येथील एरोट्रान्स या खाजगी
या हेलिकॉप्टरबाबत मिळालेली माहिती अशी की पुणे येथील एरोट्रान्स या खाजगी कंपनीचे बेल ४०७ व्हीटी ओएक्सएफ हे हेलिकॉप्टर पुण्याहून कोल्हापूरकडे येत होते. या हेलिकॉप्टरला गारगोटी येथे जायचे होते. रेणू माधव हे पायलट ते हेलिकॉप्टर चालवत होते, तर त्यांच्या सोबत आदित्य हे त्यांचे सहकारी होते. हे हेलिकॉप्टरला गारगोटी येथे मौनी महाराज जयंती कार्यक्रम आटोपून राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना मुंबई येथील एका महत्त्वाच्या मिटिंगसाठी घेऊन जाणार होते. मात्र कोल्हापूर परिसरात आल्यानंतर हेलिकॉप्टरच्या सेन्सरमध्ये बिघाड झाल्याने हेलिकॉप्टर आकाशात घिरट्या घालू लागले. हेलिकॉप्टरला दिशा कळू न शकल्याने ते गारगोटीकडे जाऊ शकत नव्हते. सकाळी १० वाजून २० मिनिटांनी पायलेट रेणू माधव यांनी हे हेलिकॉप्टर सुरक्षित जागा पाहून स.ब.खाडे महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर उतरवले.
यावेळी धुळीचे प्रचंड लोट पसरले होते. हेलिकॉप्टर जमिनीवर उतरल्याचे पाहिल्यानंतर परिसरातील विद्यार्थी आणि नागरिकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी प्रत्येकजण सेल्फी घेण्यासाठी प्रयत्न करत होता. गर्दी पाहून पायलट आणि त्याच्या सहकाऱ्याची सुरक्षिततेसाठी धावपळ उडाली होती.अखेर याची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि करवीर पोलिस एक तासानंतर घटनास्थळी दाखल झाले आणि गर्दीवर नियंत्रण आणले. दरम्यान या हेलिकॉप्टरची माहिती संबंधित पायलटने आपल्या पुणे येथील कार्यालयाला कळवली.रात्री उशिरा तंत्रज्ञांची टीम हेलिकॉप्टर दुरुस्तीसाठी दाखल होणार होती.त्यानंतर उद्या (बुधवारी) सकाळी हे हेलिकॉप्टर पुण्याला रवाना होणार आहे.दरम्यान हेलिकॉप्टर पाहण्यासाठी दिवसभर परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.