जिल्ह्यातील 789 कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना 65 लाखांचा प्रोत्साहन भत्ता
प्रतिनिधी / कोल्हापूर
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात सक्रीय योगदान दिले. राज्य शासनाने त्याची दखल घेत त्यांना प्रोत्साहनपर भत्ता देण्याचा निर्णय घेतला, अन् राज्यातील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना अनोखी दिवाळी भेट दिली. `एनआरएचएम’च्या जिल्ह्यातील 789 कंत्राटी कर्मचाऱ्यांना 65 लाखांची प्रोत्साहन भत्त्याच्या रूपात अनोखी भेट मिळाली आहे.
कोरोना प्रतिबंधात राज्यातील वैद्यकीय यंत्रणेने योगदान दिले आहे. त्यातही राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गंत कार्यरत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे योगदान महत्वपुर्ण आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत कोरोना काळात 3 ते 6 महिन्यांसाठी कंत्राटी कर्मचारी कार्यरत होते, पण करार पद्धतीने असल्याने त्यांना प्रोत्साहनपर भत्त्यांपासून वंचित रहावे लागले.
त्याची दखल घेत शासनाने त्यांना प्रोत्साहनपर भत्ता देण्याचा निर्णय घेतला, त्याची दिवाळीच्या पार्श्वभुमीवर तातडीने अंमलबजावणीही केली. पण हा भत्ता देताना त्याची त्रिस्तरीय मांडणी केली. त्यामुळे अत्यंत धोक्याच्या ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना एकप्रकारे प्रोत्साहन मिळाले आहे. कोरोना काळात अतिदक्षता विभागात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतनाइतकाच अर्थात 100 टक्के प्रोत्साहनपर भत्ता मिळणार आहे. कोरोना हॉस्पिटलमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना वेतनाच्या 75 टक्के प्रोत्साहनपर भत्ता तर अन्य कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना वेतनाच्या 50 टक्के हा भत्ता मिळणार आहे.
जिल्ह्यात राष्ट्रीय ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत 789 कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन भत्त्यांतर्गत 65 लाखांचा निधी मिळाला आहे. त्यापैकी सार्वजनिक आरोग्य विभागांर्गत जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अखत्यारीत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 30 लाख रूपये तर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला 35 लाखांचा निधी मिळाला आहे. सोमवारी जिल्हा परिषदेतील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहनपर भत्त्याच्या रूपात ही दिवाळी भेट जमा झाली आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या मुंबई येथील आयुक्तांनी त्यासाठी प्रयत्न केल्याची माहिती सुत्रांनी दिली.