केंद्र सरकारकडून नवीन गाईडलाईन्स जारी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा प्रसार कमी झाला असला तरी धोका अजूनही टळलेला नाही. त्यामुळे सणासुदीच्या काळात पुढील दोन महिने अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याच्या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवीन गाईडलाईन जारी केल्या आहेत. ज्या राज्यांमध्ये निर्बंध शिथील करण्यात आले आहेत, तिथेही कोरोना प्रसाराबाबत इशारा दिला गेला आहे.
भारतात अजूनही कोरोना विषाणूची दुसरी लाट पूर्णपणे संपलेली नाही. काही राज्यांमध्ये अजूनही कोरोनाचा प्रसार कायम आहे. त्यामुळे पुढील दोन महिने सणासुदीचा काळ असल्याने केंद्र सरकारने कोरोनाबाबत सतर्कता बाळगण्याचा सल्ला दिला आहे. याच पार्श्वभूमीवर काही नवे नियम जारी केले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना एक नवी एसओपी जारी केली गेली आहे. आरोग्य सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केल्या जाणाऱया क्षेत्रांत जिथे कोरोना संक्रमणाचा दर 5 टक्क्मयांपेक्षा अधिक आहे, तिथे सार्वजनिक कार्यक्रम टाळावे लागतील. ज्या क्षेत्रांमध्ये हा दर 5 टक्क्मयांपेक्षा कमी आहे, तिथे कार्यक्रमाआधी परवानगी घेणे गरजेचे असेल, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. तसेच स्थानिक पातळीवर रुग्णसंख्येतील वाढ आणि घट यावर त्या क्षेत्रातील निर्बंध आणि सूट याबाबतचे नियम ठरवले जावेत, असेही नियमावलीमध्ये सुचविण्यात आले आहे.
देशात दिवसभरात 31,382 नवे रुग्ण, 318 मृत्यू
देशातील कोरोना सक्रिय रुग्णांची आकडेवारी जवळपास तीन लाखांवर पोहोचली आहे. त्यात आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गुरुवारी दिवसभरात 31 हजार 382 कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 318 बाधितांनी आपला जीव गमावला आहे. याचदरम्यान दिवसभरात 32,542 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.
देशावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटपासून आतापर्यंत एकूण 3 कोटी 35 लाख 94 हजार 803 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 46 हजार 368 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत देशभरातील 3 कोटी 28 लाख 48 हजार 273 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या 3 लाख 162 रुग्ण अद्यापही कोरोनावर उपचार घेत आहेत. देशातील कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या सध्या केरळात आहे. गुरुवारी दिवसभरात केरळमध्ये 19,682 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आल्यामुळे केरळमधील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 45 लाख 79 हजार 310 वर पोहोचली आहे.