प्रतिनिधी / विटा
मोठ्या शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे चिंतेच वातावरण निर्माण होत आहे. गावातील लोकांनी शासनाच्या नियमांचे अतिशय काटेकोर पालन केले पाहिजे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे, असे आवाहन आमदार अनिल बाबर यांनी केले.
आमदार अनिल बाबर यांनी तासगाव तालुक्यातील विसापूर सर्कल मधील गावनिहाय आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. आमदार बाबर यांनी मांजर्डे, विसापूर, पेड, विजयनगर, हातनूर परिसरातील गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राना भेट देऊन तेथील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. गावातील आणि परिसरातील सर्व परिस्थितीची माहिती घेतली. आमदार बाबर यांनी गावातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही सूचना दिल्या.
जगभर चिंतेचे वातावरण निर्माण केलेल्या आणि भारतातही पाय पसरत असलेल्या कोरोना व्हायरसला लॉकडाऊन शिवाय सध्या दुसरे कोणतेही उपाय नाहीत. त्यामुळे सर्वांनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. सोशल डिस्टन्स ठेवूनच सर्व व्यवहार करावेत, असे आमदार बाबर यांनी सांगितले.
सुदैवाने अद्यापही मतदारसंघात कसल्याही प्रकारे कोरोनाचे लक्षण अथवा लागण झाली नाही. ही अत्यंत समाधानाची बाब आहे, महाराष्ट्रातील कोरोनाचे संकट वाढले असून नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. गावात कोणीही बाहेरून आला अथवा संशयित आढळला किंवा त्या सदृश्य कोणतीही लक्षणे आढळल्यास तात्काळ आरोग्य विभागाला कळवावे, असे आवाहन आमदार बाबर यांनी केले.