मानसिक स्वाथ्यासाठी योगासनाचा प्रभावी वापर : ताणतणावावर केली मात : लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन प्रशिक्षणाचा अनेकांना लाभ
संजीव खाडे/कोल्हापूर
कोरोनाच्या संकटामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी सारा देश लढत आहे. या लढय़ाला भारतीय योगाने बळ दिले आहे. लॉकडाऊनमुळे अर्थचक्र थांबल्याने व्यवसाय, नोकरी या ठिकाणी निर्माण झालेल्या परिस्थितीशी सामना करत असताना मानसिक ताणतणाव प्रचंड प्रमाणात निर्माण झाले. त्यातून शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी योगासनाकडे वळणाऱयांची संख्या लक्षणीय असल्याची माहिती या योगतज्ञांच्या संवादातून पुढे आले आहे. लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या वेळेचा सदुपयोग अनेकांनी शरीरिक आरोग्यासाठी योग शिकून केला असला तरी त्यामध्ये मानसिक स्वाथ्यासाठी योगाकडे वळलेल्यांची संख्या महत्वाची ठरल्याचे तज्ञ सांगत आहेत.
कोरोनाच्या काळातील लॉकडाऊनचे अनेक इफेक्ट अनुभवयास येत आहेत. त्यामध्ये निगेटिव्ह इफेक्टच जास्त आहेत. मात्र लॉकडाऊनच्या काळात योगासन करणाऱयांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. शहरात सर्वसाधारणपणे 15 ते 20 टक्के लोक योगाकडे वळल्याची प्राथमिक माहिती असून त्यामध्ये 45 वर्षांवरील प्रौढ व्यक्तीचे सर्वाधिक प्रमाण आहे. तर महिलांचा योगाकडे वाढणारा ओढा मोठय़ा प्रमाणावर असल्याचे या क्षेत्रातील तज्ञ सांगतात. या सर्वांनी ऍपच्या माध्यमातून ऑनलाईन योगासने शिकून त्यानुसार दररोज व्यायाम सुरू केला आहे.
आज 21 जून रोजी जागतिक योगदिन साजरा होतो आहे. यंदाचा योगदिन कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घरामध्ये, कुटुंबासोबत साजरा करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यामुळे सामाजिक अंतर राखत रविवारी योगदिन साजरा होईल. त्यासाठी योगतज्ञ आणि योगप्रेमी सज्ज झाले आहेत. अनेक आरोग्य विषयक काम करणाऱया संस्थांनी ऑनलाईन लिंकच्या माध्यमातून योगदिनी लाईव्ह सहभाग घेता येणार आहे. त्यासाठी हजारो योगप्रेमींनी अर्जही भरले आहेत, अशी माहिती जायंटस् गुप कोल्हापूरचे अध्यक्ष प्रदीप घाटगे यांनी दिली.
कोल्हापूर शहरात 1976 मध्ये विद्यापीठ हायस्कूलचे तत्कालिन शिक्षक (कै.) अंबादास खोत यांनी पहिल्यांदा योगवर्ग सुरू केले. त्यानंतर सावंत गुरूजी, तांदळे गुरूजी, कृष्णा गुरव सर योगवर्ग घेत होते. नंतरच्या काळात पंतजली, भारत स्वाभिमान संस्था, आर्ट ऑफ लिव्हिंग यासह मान्यवर संस्थांच्या माध्यमातून जिल्हय़ात हजारो पुरूष, महिला, युवक, युवती योगाचे धडे घेत आहेत. त्यातून स्थानिक योगगुरूही तयार झाले आहेत. त्यामध्ये डिंपल गजवाणी-हिडदुगी, अशोक देसाई, बामणीकर, विद्यालक्ष्मी राजहंस यांच्यासह इतर योगगुरू प्रशिक्षण देत आहेत.
रक्तदाब, मधुमेह यासह इतर शारीरिक व्याधीपासून दूर राहण्यासाठी योगासने करण्यांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर मन, शरीर, भावना आणि ताणतणाव या संदर्भात नियंत्रण ठेवण्याचे काम करणारा योग आता सर्वांना जवळचा वाटू लागला आहे. त्यातून योगाकडे वळणाऱयांच्या संख्येत भर पडत आहे. कोरोनाचा माणसाच्या श्वासन क्रियेशी संबंध येतो. श्वसन क्रिया सशक्त करण्याचे काम योगासनाव्दारे करता येते, त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी योगासनाचा, प्राणायामातील क्रियांचा मार्ग स्वीकारल्याचे वनाषौधीचे अभ्यासक अशोक देसाई यांनी सांगितले.
लॉकडाऊनमुळे अर्थचक्र थांबले. आर्थिक संकट निर्माण झाले. त्यामुळे उद्योजक, व्यावसायिक, नोकरदार, कष्टकरी असे सर्वच गटातील नागरिक आर्थिक गर्तेत सापडले. त्यातून जे मानसिक अस्वस्थतेतून निर्माण झालेले ताणतणाव आणि मानसिक आजार यातून सावरण्यासाठी योग, ध्यान आणि सुदर्शनक्रिया शिकून त्याचा प्रभावी वापर केला. त्यातून अनेक जणांनी स्वतःला मानसिकदृष्टय़ा सावरले असल्याची माहिती आर्ट ऑफ लिव्हिंगच्या महाराष्ट्र राज्य प्रशिक्षक समन्वयक डिंपल गजवाणी-हिडदुगी यांनी दिली. ऑनलाईनवरून ऍपच्या माध्यमातून अनेकांनी योगासनचे प्रशिक्षण घेऊन सराव सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या बचावासाठी आयुर्वेदीक काढा
आयुर्वेदात प्रतिकार शक्ती वाढविणारे अनेक काढे आहेत. कोरोनाच्या काळात प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी स्थानिक आयुर्वेद, वनाषौधीतील अभ्यासकांनी काढे तयार केले. गुळवेल, तुळस, लवंग, दालचिनी, वावडिंग, पिंपळी, सितोफलादी चुर्ण, काळीमीरी, तमालपत्री, हळद, अश्वगंधा आदी एकत्रित करून त्याचे चुर्ण (पावडर) तयार केले जाते. या पावडरपासून काढा तयार केला जातो. या काढय़ाचा लाभ कोरोनापासून बचाव करण्यासाठी होतो, असे वनाषौधीचे अभ्यासक अशोक देसाई यांनी दिली.
विद्यापीठ हायस्कूलची अशीही परंपरा
भक्तीसेवा विद्यापीठ हायस्कूलमध्ये गेली पन्नास वर्षे एक लक्ष सूर्यनमस्काराचा उपक्रम राबविला जातो. योगाचा महत्वाचा आसन प्रकार असणारा सूर्यनमस्कार शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्वाचा आहे.