प्रतिनिधी / कोल्हापूर
गत सहा महिन्यांपासून कोरोनाचे सावट आणि लॉकडाऊनमुळे त्रस्त असणाऱया नागरिकांनी घरोघरी मोठय़ा भक्तिमय वातावरणात गणेशाची प्रतिष्ठापना केली. ‘गणपती बाप्पा जगावरील कोरोनाचे संकट दूर होऊ दे आणि सर्व काही पूर्वपदावर येऊ दे’ असे कोरोनामुक्तीचे साकडे विघ्नहर्त्या गणरायाला घरोघरी घालण्यात आले आहे.
कोरोनाच्या सावटाखाली यंदा गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. अत्यंत साधेपणाने यंदा गणेशोत्सव पार पडत आहे. मात्र कोरोनाची भीती झुगारुन नागरिकांनी तितक्याच भक्तिने व श्रद्धेने घरोघरी श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठापना केली. दरवर्षी शहरातील गंगावेश, पापाची तिकटी, दत्त गल्ली, शाहूपुरीतील कुंभार गल्ली, संत गोरा कुंभार वसाहत, उपनगरातील स्टॉल अशा अनेक ठिकाणाहून गणपती नेण्यासाठी नागरिक गणेशचतुर्थी दिवशी गर्दी करतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गुरुवार, शुक्रवारीच गणेशमूर्ती घरी नेल्या आहेत. यामुळे शनिवारी नेहमीच्या प्रमाणात कमी गर्दी होती.
भक्तिभावाने, थाटामाटात प्रतिष्ठापना
शनिवारी सकाळी 8 ते 9 आणि 11 ते सायंकाळी 5.15 पर्यंत गणेश प्रतिष्ठापनेसाठी शुभ मुहूर्त होता. प्रतिष्ठापना करताना लाल फुल, अक्षता, दुर्वा, शमी वाहून गणरायाची मनोभावे पूजा घरोघरी करण्यात आली. यानंतर आरती ओवाळून गणपतीचे औक्षण व नैवेद्य दाखवून आरती करण्यात आली.
गर्दीचा अंदाज घेत आगमन
अनेकांनी दोन दिवसांपूर्वीच गणरायाचे आगमन केले होते. मात्र शनिवारी सकाळी मुहूर्तावर प्रतिष्ठापना केली. शनिवारी सकाळी शहरातील कुंभार गल्ल्या तसेच अनेक स्टॉलवर नागरिक गर्दीचा अंदाज घेऊन गणपती घेण्यासाठी जात होते. गर्दी असेल तर काही काळ गर्दी पासून थांबणे अनेकांनी पसंत केल्याचे दिसून येत होते.
रिक्षा व्यावसायिकांना हातभार
कोरोना आणि लॉकडाऊनचा फटका सर्वात जास्त रिक्षा व्यावसायिकांना बसला आहे. गत चार महिन्यांपासून रिक्षा व्यवसायाचे चाक आर्थिक अरिष्टय़ात अडकले आहे. मात्र, शनिवारी त्यांना अच्छे दिन आल्याचे चित्र पहावयास मिळाले. घरगुती गणपती घरी नेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना रिक्षाचा आधार होता.
फळ, फुले विक्रेत्यांची चांदी
गणेशचतुर्थीच्या पार्श्वभूमीवर फळ, फुले आणि इतर साहित्य विक्रेत्यांची चांदी झाली. पुजेसाठी लागणाऱया पाच फळांचा दर 80 ते 120 रुपयांपर्यंत पोहोचला होता. तर झेंडूची फुले 200 रुपये किलोने विकली जात होती. यासह दुर्वा, गुलाब, जलबेरा, निशीगंधा आदी फुलांची मागणीही मोठय़ा प्रमाणात वाढली होती. मात्र मागणीच्या प्रमाणात फुलांचा तुटवडा असल्याने चढय़ा भावाने फुलांची विक्री केली जात होती.
काही ठिकाणी वाजतगाजत आगमन
काही ठिकाणी अत्यंत साधेपणाने गणरायाचे आगमन करण्यात आले तर काही ठिकाणी वाजतगाजत आगमन करण्यात आले. यामुळे बेंजो, झांजपथक, हलगी वादकांना काम मिळाले.
सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर
कुंभार गल्लीमध्ये गणेशमूर्ती नेण्यासाठी आलेल्या नागरिकांनी सोशल डिस्टन्स आणि मास्कचा वापर केल्याचे चित्र होते. तर काही ठिकाणी गणेशमूर्ती नेण्यासाठी घरातील कमीत कमी सदस्यांनीच येणे पसंत केले.
दीड दिवसांच्या गणपतीचे आज विसर्जन
शहरासह जिह्यात काही ठिकाणी दीड दिवसांच्या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येते. या गणपतीचे रविवारी दुपारनंतर विसर्जन करण्यात येणार आहे. महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रत्येक भागामध्ये विसर्जन कुंड तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणीच गर्दी न करता विसर्जन करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
मोरयाचा गजर
‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर आणि टाळ्यांचा कडकडाट अशा वातावरणात यंदा सर्व ठिकाणी घरगुती गणपतीचे आगमन झाले. फटाक्यांची आतिषबाजीला यावेळी फाटा देण्यात आला होता.