प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात गुरूवारी 1 एप्रिलपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू होत आहे. या टप्प्यात जिल्ह्यातील 45 वर्षांवरील 11 लाख 50 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात येणार आहे. त्यासाठी 100 लसीकरण केंद्रे वाढवण्यात आली आहेत. जिल्ह्यात 250 केंद्रांवर 45 वर्षावरील कोणालाही आता व्याधीग्रस्त प्रमाणपत्राशिवाय लस घेता येणार आहे, अशी माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. फारूक देसाई यांनी बुधवारी दिली.
जिल्ह्यात 16 जानेवारीला हेल्थ वर्कर्सना पहिल्या टप्प्यात लसीकरण झाले. मंगळवारी दिवसभरात 408 आरोग्यसेवकांनी पहिला तर 285 जणांनी दुसरा डोस घेतला. आजपर्यत 36 हजार 349 जणांनी लस घेतली आहे. लसीकरणाची ही टक्केवारी 95 इतकी आहे. दुसऱया टप्प्यात प्रंटलाईन वर्कर्स अर्थात पोलीस, होमगार्ड, महसुल कर्मचाऱयांना लस देण्यात आली. मंगळवारी 938 जणांनी पहिला तर 399 जणांनी दुसरा डोंस घेतला. आजपर्यत 30 हजार 520 जणांनी लस घेतली आहे. ही टक्केवारी 102 टक्क्यांइतकी आहे.
मार्चमध्ये 45 वर्षावरील आणि 59 वर्षापर्यतचे व्याधीग्रस्त आणि 60 वर्षावरील ज्येष्ठांना लसीकरण सुरू झाले. मंगळवारी 5 हजार 15 व्याधीग्रस्तांनी पहिला तर 11 जणांनी दुसरा डोस घेतला आजपर्यत 47 हजार 134 व्याधीग्रस्तांनी लस घेतली. तसेच मंगळवारी 15 हजार 669 ज्येष्ठांनी पहिला डोस घेतला तर 46 जणांनी दुसरा डोस घेतला 1 लाख 88 हजार 544 जणांनी लस घेतली आहे. ज्येष्ठांच्या लसीकरणाची टक्केवारी 52 टक्क्यांवर पोहोचली आहे. जिल्ह्यात मंगळवारी 21 हजार 430 जणांनी लस घेतली. आजपर्यत 3 लाख 2 हजार 547 जणांनी लस घेतल्याने एकूण टक्केवारी 42 इतकी झाली आहे.
जिल्ह्यात 1 एप्रिलपासून 45 वर्षावरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. त्यासाठी आता व्याधीग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र लागणार नाही. जिल्ह्यात असे लाभार्थी 11 लाख 50 हजार इतके आहेत. त्यांच्यासाठी आणखी 100 लसीकरण केंद्रे वाढवण्यात आली आहे. सध्या 150 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. गुरूवारपासून लसीकरण केंद्रांची संख्या 350 इतकी होणार आहे, लसीकरणाची तयारी पुर्ण झाल्याची माहिती डॉ. फारूक देसाई यांनी दिली.