प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हा नियोजन समितीची बैठक 30 ऑक्टोबरला होणार असल्यामुळे अखेर विकासकामांना निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही बैठक झाली असल्यामुळे जि.प.चे सर्व सदस्यांसह आमदार, खासदार निधीच्या प्रतिक्षेत होते. पण सोमवारी झालेल्या पालकसचिव राजगोपाल देवारा यांच्या दौऱयानंतर समितीच्या बैठकीची तारीख निश्चित झाली आहे.
कोल्हापूर जिह्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत (सर्वसाधारण) सुमारे 375 कोटींची तरतूद आहे. पण विधान परिषदेची निवडणूक येत्या डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता असल्यामुळे त्याची आचारसंहिता नोव्हेंबरच्या उत्तरार्धात लागण्याची शक्यता आहे. ही निवडणूक झाल्यानंतर लगेच जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे. परिणामी निधीची तरतूद असतानाही विकासकामांना आचारसंहितेचा अडथळा निर्माण होणार आहे. त्यामुळे जिल्हा नियोजनच्या बैठकीनंतर लगेच 2 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा घेण्याचे निश्चित झाले आहे. या सभेमध्ये विकासकामांना मंजूरी दिली जाणार आहे.
गुरुवारी जि.प.ची आढावा बैठक
जिल्हा नियोजन समिती बैठक आणि जि.प.च्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (21 रोजी) गडहिंग्लज येथे जिल्हा परिषदेची आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत सर्वसाधारण सभेतील विषय आणि विकासकामांचा आराखडा निश्चित केला जाणार आहे.