18 जानेवारीला मततमोजणी : 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिह्यातील 433 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे बिगुल वाजले. या ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान होणार असून 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. यासाठी 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणूक असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे.
एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधित मुदत संपणार्या ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक लागली आहे.
यामध्ये जिह्यातील 433 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार मंगळवारी (दि. 15) तहसिलदारांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करायची आहे. उमेदवारी अर्ज भरायला 23 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. 30 डिसेंबरपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत अर्ज स्विकारले जाणार आहेत. यामध्ये 25, 26 व 27 डिसेंबरला सार्वजनिक सुट्या असल्याने अर्ज स्विकारले जाणार नाहीत. 31 डिसेंबरला प्राप्त अर्जांवर छाननी होईल. 4 जानेवारीला दुपारी 3 पर्यंत अर्ज माघारीचा कालावधि असणार आहे.
याच दिवशी दुपारी 3 नंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल. त्यानंतर 15 जानेवारीला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 यावेळेत मतदान होणार आहे. 18 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. यानंतर 21 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूक निकालाची अधिसुचना प्रसिध्द केली जाणार आहे.