वार्ताहर / पुलाची शिरोली
ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली खाली सापडून सावर्डे ता. हातकणंगले येथील डॉक्टर युवती ठार झाली. राजलक्ष्मी सयाजीराव जाधव-पाटील (वय वर्षे २४, रा. सावर्डे, ता. हातकणंगले) असे तिचे नाव आहे.
वडील सयाजीराव चिमासाहेब जाधव पाटील यांच्यावर सुरू असणाऱ्या वैद्यकीय उपचारांसाठी त्या कोल्हापूरला वडिलांसोबत मोटारसायकलवरून खासगी रुग्णालयात निघाल्या होत्या. शिये-कसबा बावडा राज्य मार्गावर रामनगर, शिये येथे दुपारी पावणे दोनच्या सुमारास हा अपघात झाला. याबाबत घटनास्थळी व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, सयाजीराव यांच्यावर हृदयविकार संबंधित वैद्यकीय उपचार सुरू आहेत. ते सावर्डे ते कोल्हापूर हा प्रवास मोटारसायकलने करतात.
राजलक्ष्मी त्यांच्या मोटारसायकलवर मागील बाजूस बसल्या होत्या. शिये-कसबा बावडा राज्य मार्गावर रामनगर, शिये येथे चंदूर येथील पुजारी यांचा ट्रॅक्टर ऊसाने भरलेल्या दोन ट्रॉली घेऊन राजाराम साखर कारखान्याकडे जात असताना सयाजीराव यांच्या मोटारसायकलला ओव्हरटेक करत होता. अरुंद रस्ता, अस्ताव्यस्त पार्किंग आणि छोट्या मोठ्या अतिक्रमणामुळे ट्रॅक्टर चालक वेडीवाकडी वळणे घेत वाहन चालवत होता. यामुळे सयाजीराव यांचे मोटारसायकलवरचे नियंत्रण सुटले. मोटारसायकल घसरली आणि राजलक्ष्मी रस्त्यावर पडल्या. त्याच क्षणी ऊसाने भरलेल्या ट्रॉलीचे चाक त्यांच्या अंगावर येऊन धडकले आणि त्यांना काही अंतर तसेच फरफटत नेले. प्रवाशांनी आरडाओरड करून ट्रॅक्टर चालकास थांबवले. तोपर्यंत राजलक्ष्मी यांचा मृत्यू झाला होता.
राजलक्ष्मी या गडहिंग्लज वैद्यकीय महाविद्यालयातून बीएचएमएस झाल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या वैद्यकीय परीक्षेचा अंतीम वर्षाचा निकाल सोमवारीच लागला आहे. आज वडिलांच्या उपचाराची माहिती घेऊन त्या आपले निकालपत्र आणण्यासाठी जाणार होत्या. त्यांची दुसरी बहिण त्याच महाविद्यालयात तृतीय वर्षात शिकत आहे. तसेच तिसरी बहिण नववीच्या वर्गात शिकत आहे. तर वडिल सयाजीराव चिमासाहेब जाधव पाटील हे सावर्डे येथील शाळेत लिपिक आहेत. अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे.
रामनगर येथील चित्तेवान मळ्यात केंद्र व राज्य पातळीवरील अनेक स्पर्धा परिक्षेचे मुख्य केंद्र आहे. येथे येणारे विद्यार्थी व पालक रस्त्याच्या दुतर्फा अस्ताव्यस्त वाहने पार्किंग करतात. त्यामुळे वाहतूकीची प्रचंड कोंडी होते. व अपघाताचे प्रमाण अधिक झाले आहे. याचा पोलीस प्रशासनाने बंदोबस्त करणे आवश्यक आहे.