दीपा मगदूम, उमा बनछोडे, जयश्री चव्हाण यांच्या पैकी एका सदस्याला संधी शक्य
प्रतिनिधी/कोल्हापूर
महापौर निलोफर आजरेकर या येत्या चार पाच दिवसांत आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्या जागी दीपा मगदूम, उमा बनछोडे आणि जयश्री चव्हाण यांच्या पैकी एका सदस्याला काँग्रेसकडून पुढील महापौर म्हणून संधी दिली जाण्याची शक्यता आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात आजरेकर या महापौरपदी विराजमान झाल्या होत्या. गेली सहा महिने त्यांची चांगले कार्य केले. कोरोनाच्या काळात त्यांनी केलेले कार्य लक्षवेधी ठरले. विद्यमान सभागृहाची मुदत 15 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे आणखी एका सदस्याला महापौरपदी संधी देण्याचे काँग्रेस नेत्यांचे प्रयत्न आहेत. या प्रयत्नांचा भाग म्हणून आजरेकर यांच्यानंतर दीपा मगदूम, उमा बनछोडे आणि जयश्री चव्हाण यांच्या पैकी एका सदस्याला महापौरपदी संधी मिळू शकते. या बाबतचा अंतिम निर्णय काँग्रेस नेते, पालकमंत्री सतेज पाटील घेणार आहेत. आजरेकर यांच्या राजीनाम्यानंतर कुणाला संधी मिळणार हे अर्ज दाखल करताना स्पष्ट होणार आहे.