राज्यात सरासरी 8.80 टक्के वाढ : जमिनीच्या दरातील वाढीमुळे घरबांधणे होणार महाग
प्रतिनिधी/कोल्हापूर
राज्य सरकारने गुरूवारी राज्यातील रेडिरेकनरचे (जमिनीचे वार्षिक बाजार मूल्य) दर जाहीर केले. यामध्ये सरासरी 8.80 टक्के वाढ झाली आहे. कोल्हापूरच्या रेडिरेकरमध्ये गतवेळच्या तुलनेत 6.45 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात राज्य शासनाने रेडिरेकनरच्या दरात वाढ केली नव्हती. राज्य शासनाने गुरूवारी जाहीर केलेल्या रेडिरेकनरच्या नवीन दराची अंमलबजावणी मुंबई वगळता राज्यात इतर सर्व ठिकाणी आज 1 एप्रिल पासून सुरू होणार आहे. 2022 – 2023 या आर्थिक वर्षासाठी हे रेडिरेकनरचे नवीन दर असणार आहेत.
रेडिरेकनरच्या नवीन दरानुसार राज्यातील ग्रामीण भागात सरासरी 6.96 टक्के वाढ होणार आहे. नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात 3.62 टक्के रेडिरेकनरमध्ये वाढ झाली आहे. मुंबई वगळता राज्यातील इतर महापालिकांच्या क्षेत्रात सरासरी एकूण 5 टक्के रेडिरेकनर वाढला आहे. सर्व राज्याचा विचार करता ही वाढ सरासरी 8.80 टक्के इतकी झाली आहे. बृहन्मुंबई क्षेत्रात मात्र सर्वात कमी सरासरी 2.34 टक्के रेडिरेकनर वाढला आहे. पण यामध्ये मुंबईचा समावेश केलेला नाही. राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने 2022-2023 या वर्षासाठी रेडेरेकनरच्या दरातील वाढ शासनाकडे प्रस्तावित केली होती. त्यावर गुरूवारी निर्णय घेत शासनाने नवा रेडिरेकनर जाहीर केला.
शहरातील विविध भागातील रेडिरेकनर प्रत्यक्षात किती असणार हे शासन आदेश हाती आल्यानंतर स्पष्ट होईल. बांधकाम परवानगी घेत असताना भरावे लागणारे बहुतांश कर हे जमिनीच्या दरानुसार आकारले जातात. त्यामुळे जमिन दरात झालेल्या वाढीमुळे बांधकामाचेही दर त्या प्रमाणात वाढणार आहेत.
-विद्यानंद बेडेकर, अध्यक्ष, कोल्हापूर क्रीडाई