एखाद्या संघाचा पहिलाच आंतरराष्ट्रीय दौरा : दोन्ही संघांत 3 कसोटी सामन्यांची मालिका रंगणार, पहिली कसोटी दि. 8 जुलैपासून
मँचेस्टर / वृत्तसंस्था
अवघ्या जगभरात कोव्हिड-19 चे अस्मानी संकटरुपी वादळ अक्षरशः थैमान घालत असताना आणि अगदी इंग्लंडमध्येही हा प्रकोप दिवसेंदिवस रुद्र रुप धारण करत असताना जेसॉन होल्डरच्या नेतृत्वाखालील विंडीजचा क्रिकेट संघ मंगळवारी मँचेस्टरमध्ये दाखल झाला. यजमान इंग्लंडविरुद्ध हा संघ 3 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार असून त्यातील पहिली कसोटी 8 जुलैपासून होईल. कोव्हिडच्या संकटात अवघे जग तावून सुलाखून निघत असताना गेल्या तीन महिन्यातील एखाद्या संघाचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय दौरा ठरला आहे.
तत्पूर्वी, सर्व खेळाडू व प्रशिक्षण पथकातील सदस्यांची कोव्हिड चाचणी घेतली गेली असून त्यांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सर्व सदस्यांची यानंतरही आणखी एकदा कोव्हिड चाचणी घेतली जाणार आहे.
37 सदस्यांचा मोठा ताफा
विंडीजने या महत्त्वाकांक्षी मालिकेसाठी 25 खेळाडू व प्रशिक्षण पथकातील 12 सदस्य असा एकूण 37 जणांचा मोठा ताफा इंग्लंड दौऱयावर पाठवला असून या दौऱयादरम्यान पूर्ण वेळ विंडीज खेळाडूंसाठी जैविक सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य दिले जाईल. शिवाय, मैदानात, मैदानाबाहेर काटेकोर नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. 11 राखीव खेळाडू देखील मुख्य संघासमवेतच असतील. एखाद्या खेळाडूला दुखापत झाल्यास या राखीव खेळाडूंमधून पर्याय निवडला जाईल.
पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, ही मालिका जूनमध्ये होणे अपेक्षित होती. पण, कोव्हिड-19 च्या प्रकोपामुळे ती लांबणीवर टाकली गेली. कोव्हिडमुळे लांबणीवर टाकली गेलेली ती पहिलीच मालिका देखील ठरली. या मालिकेसाठी पारंपरिक ओव्हल, एजबस्टन व लॉर्ड्सपेक्षा एजिस बॉल व ओल्ड ट्रफोर्ड या जैविकदृष्टय़ा अधिक सुरक्षित ठिकाणांना प्राधान्य दिले गेले आहे.
विंडीज कसोटी संघ : जेसॉन होल्डर (कर्णधार), जेरमेन ब्लॅकवूड, न्प्रुमाह बॉन्नर, क्रेग ब्रेथवेट, शेमर ब्रूक्स, जॉन कॅम्पबेल, रोस्टन चेस, रहकीम कॉर्नवल, शेन डॉरिच, केमर होल्डर, शाय होप, अल्झारी जोसेफ, रेमन रेफर, केमर रॉश.
राखीव खेळाडू : सुनील ऍम्ब्रिस, जोशुआ डॅसिल्व्हा, शेनॉन गॅब्रिएल, किओन हार्डिंग, काईल मेयर्स, प्रिस्टॉन मॅकस्वीन, मॅर्क्विन्हो मिंडली, शेन मोसेले, अँडरसन फिलीप, ओशेन थॉमस, जोमेल वॉरिकन.
संघव्यवस्थापन : फिल सिमन्स (मुख्य प्रशिक्षक), रॉल लुईस (संघ व्यवस्थापक), रॉडी इस्टविक (सहायक प्रशिक्षक), रेयॉन ग्रिफिथ (साहायक प्रशिक्षक), फ्लॉईड रेफर (फलंदाजी प्रशिक्षक), डॉ. प्रेमानंद सिंग (संघाचे डॉक्टर), रोनाल्ड रॉजर्स (स्टेंथ, कंडिशनिंग कोच), डेनिस बियाम (फीजिओथेरपिस्ट), नील बॅरी ज्युनियर (फिजीओथेरपिस्ट), झेफिरिनस निकोलस (मसाज थेरपिस्ट), ए. आर. श्रीकांत (संघ विश्लेषक), डॅरिओ बार्थली (माध्यम व्यवस्थापक).
कसोटी मालिकेची रुपरेषा
लढत / तारीख / ठिकाण
पहिली कसोटी / 8 ते 12 जुलै / एजिस बॉल, साऊथम्प्टन
दुसरी कसोटी / 16 ते 20 जुलै / ओल्ड ट्रफोर्ड, मँचेस्टर
तिसरी कसोटी / 24 ते 28 जुलै / ओल्ड टॅफोर्ड, मँचेस्टर
कोटस
मागील दोन-तीन महिने जुन्या सामन्यांचे प्रक्षेपण पाहून चाहत्यांना अर्थातच उबग आलेला असेल. सध्याच्या घडीला अवघ्या क्रिकेट जगताला मैदानावर नव्याने खेळ सुरु होण्याचे वेध लागलेले आहेत. त्यामुळे, ही मालिका विशेष लक्षवेधी ठरेल. -इंग्लिश कर्णधार जो रुट