पिझ्झा, आइस्क्रीम, कॉफी आदींची खरेदी शक्य – युनोकॉईनच्या ऍपचा करता येणार वापर
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतामधील सर्वात जुना क्रिप्टो करन्सी ट्रेडिंग प्लॅटफार्म युनोकॉईनने आपल्या ग्राहकांसाठी बिटकॉईनच्या आधारे 90 ब्रँड्सच्या साहित्याची खरेदी करण्याची संधी उपलब्ध केली आहे. कंपनीने दिलेल्या अधिकच्या माहितीनुसार बिटकॉईनच्या माध्यमातून डॉमिनो पिझ्झा, बास्किन रॉबिन आइस्क्रीम, कॅफे कॉफी डे येथून खरेदी करता येणार असल्याची माहिती आहे. यासह विविध ब्रँड्सच्या वस्तुंसह अन्य सामान खरेदी करण्याच्या सेवांसाठीही बिटकॉईनचा वापर करता येणार आहे.
बेंगळूरच्या स्टार्टअपने दिलेल्या माहितीनुसार युनोकॉईनच्या नोंदणीकृत ग्राहकांना सामान खरेदी करण्यासाठी 100 रुपये आणि 5,000 रुपये इतक्या मूल्याच्या बिटकॉईनचा वापर करता येणार आहे.
अमेरिकेसह अन्य देशांत अगोदरच अशी व्यवस्था
अमेरिकेसारख्या देशामध्ये पेमेन्टसाठी बिटकॉईनचा स्विकार करणारे हजारो आउटलेटस् आणि ई कॉमर्स पोर्टल्स आहेत. परंतु याच्याविरुद्ध बाजूला आपल्याकडे यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. इतर देशातही बिटकॉईनचा वापर होतो.
क्रिप्टोच्या अधिकच्या वापरावर भर
आम्ही बिटकॉईनला बार्टर असेट्सच्या स्वरुपात स्वीकार करत आहोत. या अगोदरपासून या माध्यमातून जगभरातील लाखो ग्राहक खरेदी करत आहेत. यामुळे आम्ही भारतीयांना क्रिप्टो करन्सीचे महत्त्व पटवून देतानाच वापराबाबत जास्तीत जास्त जागरुक करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे युनोकॉईनचे सीईओ सात्विक विश्वनाथ यांनी स्पष्ट केले आहे.