खंडणीप्रकरणी धर्मेश सगलानीला अटक : इतर पाच संशयितांनाही घेतले ताब्यात : 50 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप
प्रतिनिधी /पणजी
फरिदाबाद हरियाणा येथील व्यावसायिक अंकित जाजोदिया यांना धमकावून 50 लाख रुपयाची खंडणी मागितल्याप्रकरणी सांखळी पालिकेचे नगराध्यक्ष धर्मेश सगलानी व इतर पाच जणांना आगशी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस याप्रकरणी तपार करीत आहेत.
धर्मेश सगलानी याने पाच बाऊन्सर सोबत कुडका बांबोळी येथील सदर तक्रारदाराच्या बंगल्यावर जाऊन त्याला पैसे वसुलीप्रकरणी धमकावले होते, अशी तक्रार त्या तक्रारदाराने दि. 23 जानेवारी 2022 रोजी आगशी पोलीस स्थानकात दिली होती. धर्मेश सगलानी यांचा कोणकोण येथील समुद्रकिनारी पर्यटन व्यवसायाशी संबंध आहे. या व्यवसायासंबंधी झालेल्या जमीन व्यवहारातून उद्भवलेल्या आर्थिक वादातून सदर तक्रार पुढे आली असल्याचा खुलासा यापूर्वी सगलानी याने केला होता व राजकीय हेतुने सदर तक्रार नोंद झाल्याचा आरोप केला होता.
खंडणी नाही, मग बाऊन्सर का नेले?
जमीन व्यवहारातून देवाणघेवाणीचा आर्थिक वाद उदभवला तर दिवाणी न्यायालयात नेऊन सदर प्रकरण सोडवले जाऊ शकले असते. पण सोबत बाऊन्सर नेऊन मारहाण करुन तसेच जिवंत मारण्याची धमकी देऊन मागितलेले पैसे ही खंडणीच असल्याचे गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांचे म्हणणे आहे.
आगशी पोलीस स्थानकात नोंद झालेला गुन्हा क्र. 7/2022 आता गुन्हा अन्वेषण विभागाकडे पाठविण्यात आला आहे. सगलानी याच्या सोबत गेलेल्या पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यात काही बाऊन्सरचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जामिनासाठी धाव
सांखळी मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर विधानसभा निवडणूक लढवलेल्या धर्मेश सगलानी यांनी ही राजकीय खेळी असल्याचा आरोप करुन लगेच जामिनासाठी न्यायालयात सोमवारी रात्री धाव घेतली.
पोलिसांनी सदर संशयितांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात नेऊन वैद्यकीय चाचणी करुन घेतली. नंतर आगशी येथील कोठडीत ठेवले. मंगळवारी न्यायालयासमोर उभे करुन त्यांना रिमांड घेतला जाणार आहे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. अटकपूर्व जामिनासाठी धाव घेण्याची धर्मेश सगलानी याच्याकडे संधी होती. ही संधी हुकली तरी आता जामीन अर्जावरील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
पुरावे मिळाल्यानंतरच झाली अटक
तक्रारदार अंकित जजोदिया हा फरिदाबाद हरियाणा येथील व्यावसायिक असून त्याच्या कुडका बांबोळी येथे असलेल्या बंगल्यात सदर कथित खंडणी मागण्याचा प्रकार घडला होता. दि. 22 जानेवारी 2022 रोजी गुन्हय़ाची नोंद झाली होती पण पोलिसांनी तेव्हा कोणालाच अटक केली नाही किंवा चौकशीसाठी पाचारणही केले नाही. सदर बंगल्या सभोवती असलेल्या सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी आधी ताब्यात घेतल्यानंतर संशयित आरोपींना अटक केली.