खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात दररोज कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना मंगळवारी एकाच दिवसात 41 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. एकाच दिवसात मोठय़ा प्रमाणात कोरोनाबाधित सापडल्याने एकच खळबळ माजली आहे. त्यामध्ये 41 कोरोनाबाधितांपैकी नंदगड गावातील बजंत्री गल्लीमध्ये 30 कोरोनाबाधित सापडल्याने नंदगड आता कोरोनाचे तालुक्यातील हॉटस्पॉट बनले आहे.
गेल्या चार दिवसांपूर्वी नंदगडमधील एकाच गल्लीमध्ये चार कोरोनाबाधित सापडले होते. यानंतर सोनार गल्ली, बजंत्री गल्लीमधील 70 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यामध्ये एकाच दिवशी 30 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामध्ये 9 बालकांचाही समावेश असून त्यांची वये अनुक्रमे 11, 12, 13, 14, 15, 18 5, 7 व 6 वर्षीय बालिका व बालकांचा समावेश आहे. या शिवाय नंदगडमध्ये दोन पोलिसांचा अहवालही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. एकाच गल्लीत 30 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने नंदगड गावात कोरोनाची धास्ती अधिकच वाढली आहे. या संदर्भात आशा कार्यकर्त्या तसेच आरोग्य पथक कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी गेले असता बजंत्री गल्लीतील नागरिक व आशा कार्यकर्त्या तसेच आरोग्य पथकात शाब्दिक चकमक झाली. एकाच दिवसात एवढे कोरोनाबाधित सापडतील कसे, तुम्ही काय तर चुकीचे सांगत आहात, पण यानंतर पोलिसांनी येऊन सर्वांना शांत केले.
या पाठोपाठ खानापूरच्या क्षेत्रशिक्षणाधिकारी कार्यालयातही कोरोनाची व्याप्ती अधिकच वाढत चालली आहे. या कार्यालयातील 45, 53 व 53 वर्षीय पुरुष कर्मचाऱयांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. या कार्यालयातील सर्वच कर्मचाऱयांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले असून त्यांचे तपासणी अहवाल आता बाहेर पडत आहेत. सर्वप्रथम पॉझिटिव्ह सापडलेल्या शिक्षणाधिकारी कार्यालयातील त्या वरिष्ठ अधिकाऱयाच्या पत्नीचा अहवालही कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे समजते. खानापूर पोलीस क्वॉर्टर्समध्ये 38 वर्षीय महिला तसेच 36 वर्षीय पुरुषालाही कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. सरकारी दवाखान्यातील 16 वर्षीय तरुणी व 48 वर्षीय महिलेलाही कोरोना झाला आहे. तालुक्यातील कक्केरी गावातही आणखी तिघांना कोरोनाची बाधा झाली असून त्यामध्ये 55 वर्षीय महिला, 30 व 48 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. पारिश्वाड येथे 48 वर्षीय पुरुषाला कोरोना झाला आहे. मंगळवारी सापडलेल्या एकूण 41 कोरोना बाधितांमध्ये 26 महिला व 15 पुरुषांचा समावेश आहे. खानापूर तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत असून आता ती संख्या 227 पर्यंत पोहोचली आहे.
स्वॅब संग्रह कक्षाची सुरुवात
तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना बाधितांमुळे तपासणी अहवाल जलदगतीने मिळावेत, यासाठी आता सरकारी दवाखान्यात स्वॅब संग्रह मशीन बसविण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आमदार अंजली निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्याधिकारी डॉ. संजय नांद्रे, डॉ. नारायण वड्डीन तसेच सरकारी दवाखान्यातील डॉक्टर्स, नर्स व इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. या मशीनमुळे आता स्वॅब कलेक्शन झटपट व अत्यंत सुरक्षितपणे होणार आहे. स्वॅब घेणाऱयांनाही या मशीनमुळे सुरक्षा मिळणार आहे.
देशामध्ये कोरोना व्हायरसची सुरुवात झाल्यानंतर खानापूर तालुक्यात जवळपास चार हजार जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत 227 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून अद्याप पाचशे जणांचा स्वॅब अहवाल येणे बाकी आहे. उर्वरित बऱयाच जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत..
सर्वगुण संपन्न विद्यार्थ्याचे होतेय कौतुक
- दहावीत 98.05 टक्के मिळविले गुण
- शिक्षणेतर उपक्रमात मिळविली अनेक बक्षिसे
18डीआय 3- मनीष सबनीस
प्रतिनिधी
बेळगाव
विविध स्पर्धांमध्ये, शिक्षणेतर उपक्रमात आघाडीवर असणारी मुले सहसा अभ्यासात चमकत नाहीत. विविध गुणदर्शनात आघाडी अन् गुणात पिछाडी असे चित्र असते. मात्र कचेरी गल्ली, शहापूर येथील विद्यार्थी सर्वगुणसंपन्न ठरला आहे. भाषण, निबंध, प्रश्नमंजुषा, वादविवाद आदी स्पर्धात चमकतानाच त्याने दहावी परीक्षेतही 98.05 टक्के गुण मिळविले असून तो कौतुकास पात्र ठरला आहे.
मनीष लीलेश सबनीस याने 613 गुण मिळविले आहेत. तो येथील महिला विद्यालय इंग्रजी माध्यम शाळेचा विद्यार्थी आहे. शाळेचा पंतप्रधान म्हणूनही त्याने जबाबदारी निभावली. रोटरी क्लबचा उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार त्याने पटकाविला आहे. शाळेनेही आदर्श विद्यार्थी, उत्कृष्ट कॅबिनेट सदस्य आणि सर्वसाधारण विजेतेपद देऊन त्याचा गौरव केला आहे.
या यशाचे श्रेय त्याने आपले पालक, मुख्याध्यापिका कविता परमाणिक, निर्मला मेंडीस आणि शिक्षकवर्गाला दिले आहे.