वार्ताहर / कणकवली:
समोरून येणाऱया एसटी बसला साईड देताना अंदाज न आल्याने खारेपाटण बसस्थानक येथून महामार्गाच्या दिशेने जात असलेली एसटी बस रस्त्यानजीकच्या सखल भागात कलंडली. सुदैवाने बस पलटी न झाल्याने मोठा अनर्थ टळला. हा अपघात खारेपाटण येथील जिल्हा मध्यवर्ती बँक इमारतीच्या पुढील रस्त्यावर सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडला.
राजापूर डेपोची खारेपाटण-तळगाव-राजापूर ही बस (एमएच20 बीएल0398) खारेपाटण बसस्थानकातून बाहेर पडून महामार्गावर जात होती. यावेळी समोरून येणाऱया सावंतवाडी-देवरुख बसला साईड देण्याचा प्रयत्न खारेपाटण-राजापूर तळगाव बसच्या चालकाने केला. यात बसचे चाक चक्क रस्त्याखाली उतरले. सध्या गणेशोत्सवानिमित्त खारेपाटण बाजारपेठ येथे मोठी गर्दी असते. कित्येक वाहनचालक रस्त्यांवर वाहने लावतात. त्यामुळेच हा अपघात घडल्याचे सुजाण ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अपघाताची माहिती समजताच खारेपाटण दूरक्षेत्राचे पोलीस उद्धव साबळे यांनीही घटनास्थळ गाठले होते.