जिल्हाधिकाऱयांनी दिली पत्रकारांना माहिती : 400 खेडय़ांमध्ये कोरोना चाचण्या पूर्ण
प्रतिनिधी / बेळगाव
सरकारी कोटय़ातून खासगी हॉस्पिटलमध्येही कोरोनावर मोफत उपचार करण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली. केवळ बिम्समध्येच दाखल होण्याची काही गरज नाही, असे सांगून खासगी हॉस्पिटलमध्येही उपचार मोफत असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली आहे.
जिल्हय़ामध्ये 24 मेपासून 400 खेडय़ांमध्ये कोरोना चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. जे संशयित कोरोना रुग्ण आढळले आहेत, त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच त्या परिसरातील कोविड सेंटर आणि तालुका हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याची सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची रॅपिड
ऍन्टिजेन टेस्ट केल्या जात आहेत. जिल्हय़ामध्ये यासाठी 50 हजार किट्स आले आहेत, असे सांगून कोरोना चाचणी प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हय़ामध्ये एकूण 1800 खेडी आहेत. त्या सर्व खेडय़ांमध्ये चाचणी करण्यात येणार आहे.
कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर उपचार करण्यासाठी तातडीने पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. कोरोना प्राथमिक स्वरुपात असताना उपचार केल्यामुळे रुग्ण लवकर बरा होतो. तेव्हा लक्षणे आढळल्यास तातडीने पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले आहे.