प्रतिनिधी/ खेड
मद्याची दुकाने खुली करण्यास सरकारने नियम व अटींची बंधने घालून सुरू करण्यास परवानगी देऊनही शहरातील शिवाजी चौकातील एकमेव मद्याचे दुकान मात्र बंदच होते. शुक्रवारी दुपारी 1 वाजता ते खुले होताच पोलीस बंदोबस्तात दारूची विक्री सुरू झाली आहे. यामुळे तळीरामांची मद्यासाठीची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आहे.
येथील मद्याचे दुकान खुले होण्याच्या शक्यतेने गेले आठवडाभर तळीराम मद्याच्या दुकानालगत घुटमळत होते. मात्र मद्यपींचा हिरमोड होत होता. नेमके मद्याचे दुकान उघडेल तरी कधी, अशी विचारणा मद्यपींकडून होत होती. काही मद्यपी घसा ओला करण्यासाठी थेट दापोली गाठत होते. येथील दुकान खुले झाल्याचे वृत्त कर्णोपकर्णी सर्वत्र पसरताच मद्यपींनी मद्य खरेदीसाठी गर्दी केली. मात्र पोलीस बंदोबस्तात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करूनच मद्याची विक्री केली जात होती.