प्रतिनिधी /पणजी
गजानन देसाई यांच्या ‘ओरबिन’ कादंबरीला जामखेड महाराष्ट्र येथील मराठी साहित्य प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वाङ्मयीन प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष साहित्यिक प्रा. आ. य. पवार यांनी ही घोषणा केली. रोख रक्कम, प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
‘ओरबिन’ कादंबरीला मिळालेला हा चौथा पुरस्कार आहे. यापूर्वी अखिल भारतीय प्रकाशक संघ पुणे, माय मराठी प्रतिष्ठान पुणे तसेच मराठी वाङ्मय परिषद, बडोदा यांचे उत्कृष्ट कादंबरीचे प्रथम पुरस्कार प्राप्त झाले आहेत. खाण व्यवसाय आणि त्या भागातील जीवनमान या विषयावरील या कादंबरीची दखल महाराष्ट्रातील नामवंत अशा समीक्षकांनी घेतली आहे.
सांखळी येथील रहिवासी गजानन देसाई वास्को येथील एमईएस उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत. यापूर्वी ‘कुळागर’ आणि ‘नियोग’ हे कथासंग्रह तसेच ‘धालो स्त्री मनाची अभिव्यक्ती’ ही बहुचर्चित पुस्तके प्रकाशित झाली आहेत. रविवारच्या दै. नवप्रभामधून त्यांचे ‘दवबिंदू’ हे सदरही लोकप्रिय होत आहे.