कोरोनामुळे शाळा प्रशासनाने घेतला निर्णय
बेळगाव : बेळगाव शहरातील एक प्रतिष्ठित शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱया गजाननराव भातकांडे इंग्रजी माध्यम शाळा आणि केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये 2021-22 शैक्षणिक वर्षासाठी तब्बल 200 विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती शाळेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे यांनी दिली.
कोरोनामुळे अनेक पालकांची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे अनेकांसमोर पाल्यांच्या प्रवेशाचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे पालकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी मोफत प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची नोंद घेत पालकांनी 15 मे पूर्वी प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शाळेतर्फे करण्यात आले आहे.
बेळगावचे पहिले नगराध्यक्ष गजाननराव भातकांडे यांनी बहुजन समाज शिक्षित व्हावा, समाजातील अंधश्रद्धा दूर व्हाव्यात यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले होते. त्याचप्रमाणे वडिलांपासून मिळालेल्या सामाजिक बांधिलकीचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी मिलिंद भातकांडे कार्यरत आहेत. एसपीएम रोड येथील भातकांडे शाळेत एलकेजी व यूकेजीमध्ये 110 तर टीचर्स कॉलनी खासबाग येथे सर्व सुविधांनीयुक्त असलेल्या केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये एलकेजी, यूकेजी व पहिलीमध्ये प्रत्येकी 30 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. तसेच 2020-21 च्या शैक्षणिक वर्षातील वार्षिक शुल्कामध्येही खास सवलत देण्यात येणार आहे. याचा पालकांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी मुख्याध्यापिका सुवर्णा खन्नूरकर (8884017645), रूपेश (9740757786), अश्विनी (9844870039) यांच्याशी संपर्क साधावा.