उचगांव / वार्ताहर
गांधीनगर (ता. करवीर ) येथे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या गोदामातून वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रो ओव्हन, वॉटर पुरिफायर आदि 99 हजार 241 रुपयांचा मुद्देमाल संगनमताने लंपास केल्याबद्दल कामगार गणेश संजय पोळ, मयूर सुनिल पोवार (दोघेही रा. जवाहरनगर कोल्हापूर), राहुल जयकांत येलेकर ( रा. सोमवार पेठ, कोल्हापूर), साहिल मन्सूर देसाई ( रा. कुशिरे ता. पन्हाळा जि. कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
दीपक कन्हैयालाल केसवाणी (रा. ताराबाई पार्क, कोल्हापूर) यांचे गांधीनगर येथे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे गोदाम आहे. त्यांच्याकडे गणेश पोळ, मयूर पोवार, राहुल येलेकर व साहिल देसाई असे चार कामगार होते. या चौघांनी केसवाणी यांना न सांगता गेल्या दोन महिन्यांपासून आजअखेर 21 हजारांची आटा चक्की, 15 हजार 750 रुपयांचे मायक्रो ओव्हन, 22 हजार किमतीचे वाशिंग मशीन व 40 हजार 491 रुपयांचे नऊ पुरिफायर असा एकूण 99 हजार 241 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. गोदाम मालक केसवाणी यांच्या ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर त्यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात या चौघा संशयितांविरुद्ध फिर्याद दिली. यानंतर गांधीनगर पोलिसांनी संशयितांना अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयायाने कोठडी सुनावली.