: एकूण मिळून १ लाख ४१० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी
कोल्हापूर / प्रतिनिधी
आरकेनगर येथील चित्रनगरी जवळ केआयटी कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर गावठी बनावटीचे पिस्टल विक्री करण्यासाठी आलेल्या कंदलगांव ( ता. करवीर ) येथील एका युवकाला पोलिसांनी सापळा लावून रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल, दोन राऊंड जप्त, एक दुचाकी असा १ लाख ४१० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
त्यानंतर त्याचेकडे चौकशी करुन त्याने ज्याच्याकडून विक्रीसाठी हे पिस्टल व राऊंड आणले होते. ‘त्या’ कोलोली (ता . पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथील पिस्तुल तस्करालाही अटक केली.
शिवाजी उर्फ संतोष नामदेव पाटील (वय २८ , रा. कंदलगांव, ता. करवीर, जि. कोल्हापूर), पिस्तुल तस्कर संदेश उर्फ रोहीत शामराव पाटील (वय २ ९, रा. कोलोली, ता. पन्हाळा, जि . कोल्हापूर) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली.
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पोलीस अधीक्षक पदभार स्विकारलेनंतर जिल्ह्यातील गुन्हेगारांना पकडून, त्यांचेकडून अवैदय शस्त्रे जप्त करुन, कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवणेच्या अनुषंगाने सुचना दिल्या होत्या. त्यावरुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी मोहिम हाती घेतली आहे. याच दरम्यान त्याना कंदलगांव येथील शिवाजी उर्फ संतोष पाटील हा युवक बेकायदेशिर अग्निशत्रे जवळ बाळगत असल्याबाबत माहिती मिळाली. तसेच तो आर. के. नगर येथील चित्रनगरी जवळ केआयटी कॉलेजकडे जाणारे रोडवर गावठी बनावटीचे पिस्टल विक्री करण्याकरीता येणार असल्याविषयी बातमीदाराकडून माहिती मिळाली. त्यावरुन त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले व त्यांचे पथकातील पो. हे. कॉ. अजित वाडेकर , राजेश आडुळकर , नितीन चोथे , अमोल कोळेकर , संदीप कुंभार , सागर कांडगांवे , राम कोळी , रफीक आवळकर आदीच्या पथकाला शिवाजी उर्फ संतोष पाटील त्याला पकडण्याबाबत आदेश दिला. त्यावरुन या पथकाने त्याला आरकेनगर येथील चित्रनगरी जवळ केआयटी कॉलेजकडे जाणारे रोडवर दुचाकीवरुन गावठी बनावटीचे पिस्टल विक्री करण्यासाठी आला त्याला रंगेहाथ पकडून अटक केली. त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे अवैधपणे एक गावठी बनावटीचे पिस्टल, दोन राऊंड मिळून आले. त्यानंतर त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदरचे बनावट पिस्टल हे संदेश उर्फ रोहीत शामराव पाटील ( रा . कोलोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर ) याच्याकडून विकत घेतल्याची माहिती दिली. त्याचाही शोध घेवून त्याला अटक केली. यादोघ विरूध्द गोकूळ शिरगांव एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला असुन, या गुन्हयाचा तपास सपोनि सुशांत चव्हाण करीत आहे.