बेळगाव कुडची ऐवजी रायबाग कुडचीला पोहचले वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी
प्रतिनिधी / मिरज
पदव्युत्तर परीक्षेच्या प्रवेशासाठी आज बुधवारी नीट परीक्षेसाठी गेलेल्या मिरजेतील सात विद्यार्थ्यांना गुगल मॅपने चुकीचा पत्ता दर्शविल्याने त्यांची वाट भरकटली. इंटरनेटवर परीक्षा केंद्राचा पत्ता शोधणाऱ्या या मेडिकल पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांना गुगल मॅपने बेळगाव कुडची ऐवजी रायबाग कुडचीला पोहचविले. त्यामुळे अधिकृत परीक्षा केंद्रावर निर्धारित वेळेत पोहचू न शकल्याने सातही विद्यार्थ्यांना परिक्षेपासून वंचित राहावे लागले.
मेडिकल पदवीधर विद्यार्थ्यांची पदव्युत्तर परीक्षा होती. या परिक्षेसाठी मिरजेतील काही विद्यार्थीही प्रविष्ठ होते. यातील काही विद्यार्थ्यांनी जवळचे परीक्षा केंद्र म्हणून बेळगाव जिल्ह्यातील कुडची केंद्र निवडले होते. या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राचा नेमका पत्ता माहीत नसल्याने त्यांनी गुगल मॅपवरून रस्ता शोधण्याचा प्रयत्न केला. गुगल मॅपनेही त्यांना डायरेक्शन करण्यास सुरुवात केली. गुगल मॅपच्या सांगण्यानुसार विद्यार्थीही जात राहिले. मात्र, गुगल मॅपने बेळगाव कुडची ऐवजी रायबाग कुडचीला नेऊन पोहचविले. जिथे रस्ता संपला तिथेही केंद्र ५० मीटरवर आहे, असे गुगल मॅप सांगत होता. नंतर तेथील स्थानिक लोकांनी सांगितले की असे कुठलेही मेडिकलच्या परीक्षेचे केंद्र येथे नाही. रायबाग कुडची व बेळगाव कुडची हे वेगवेगळे आहेत. तुम्हाला बेळगाव कुडचीमध्ये जावे लागेल.
विद्यार्थांनी शंका निरसन करण्यासाठी प्रवेश पत्रावरील पत्ता पुन्हा गुगल मॅपवर टाकला व त्यात बेळगाव असे लिहिले तर तो पत्ता चुकीचा आहे, असे गुगल मॅप सांगत होता. पण रायबाग कुडची पर्यंतचा पत्ता टाकला तर तो पत्ता बरोबर आहे, असे सांगून तो रस्त्याचे मार्गदर्शन करत होता. गुगल मॅपच्या गोंधळामुळे विद्यार्थीही गोंधळून गेले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावरील पाटील सर नामक प्राध्यापकांना फोन केला. सरांनी सांगितले परीक्षा देण्यासाठी तुमच्याकडे दोन तास आहेत. पुन्हा विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली. मात्र, सातही विद्यार्थी निर्धारीत वेळेत परीक्षा केंद्रावर पोहचू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना परीक्षेला मुकावे लागले.