वृत्तसंस्था/ अहमदाबाद
टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये महिला टेबल टेनिसचे रौप्य जिंकलेल्या भाविनाबेन पटेलला गुजरात सरकारने 3 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. गुजरातमधील मेहसाना जिल्हय़ातील सुंधिया गावची ती रहिवासी आहे. ‘या स्पर्धेत महिला टेटेमध्ये रौप्य जिंकून ऐतिहासिक कामगिरी करणाऱया भाविनाबेनने देशाचा गौरव वाढवला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी तिचे अभिनंदन केले आहे,’ असे सीएम ऑफिसने निवेदनाद्वारे सांगितले. तसेच आपल्या क्रीडा कौशल्याने देशाचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल ‘दिव्यांग खेल प्रतिभा प्रोत्साहन पुरस्कार योजना’ अंतर्गत तिला 3 कोटी रुपये प्रोत्साहन धन देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली असल्याचे त्यात म्हटले आहे.
टीटीएफआयकडून 31 लाख रुपये देण्याची घोषणा
नवी दिल्ली ः भारतीय टेबल टेनिस फेडरेशनने (टीटीएफआय) टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये रौप्य जिंकणाऱया भाविनाबेन पटेलला 31 लाख रुपये देण्याची घेषणा केली आहे. पॅरालिम्पिक्समध्ये टेबल टेनिसचे पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे. हरियाणाचे उपमुख्यमंत्री व टीटीएफआयचे अध्यक्ष दुष्यंत चौताला यांनी तिला रोख बक्षीस देण्याचे सोशल मीडिया पोस्टमधून सांगितले आहे. अंतिम फेरीत ती पराभूत झाली असली तरी तिने ऐतिहासिक रौप्य पटकावण्याचा पराक्रम केला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.