वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील तेलविपणन कंपन्यांनी 14.2 किलोग्रॅमच्या विनाअनुदानित घरगुती सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ केली आहे. तर 5 किलोग्रॅमचा छोटा सिलिंडर 18 रुपयांनी महागला आहे. तर 19 किलोग्रॅमच्या सिलिंडरची किंमत 36.50 रुपयांनी वाढली आहे.
दिल्लीत आता 14.2 किलोग्रॅमचा विनाअनुदानित सिलिंडर आता 644 रुपयांचा झाला आहे. कोलकाता येथे याची किंमत 670.50 रुपये तर मुंबईत 644 रुपये आणि चेन्नईत 660 रुपये असल्याची माहिती आयओसीएलच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे.
19 किलोग्रॅमचा वाणिज्यिक वापराचा सिलिंडरही महागला आहे. राजधानी दिल्लीत याची किंमत 1296 रुपये झाली आहे. सद्यकाळात केंद्र सरकार दरवर्षी 14.2 किलोग्रॅमच्या 12 सिलिंडरांवर अनुदान प्राप्त करते. त्याहून अधिक सिलिंडर हवा असल्यास ग्राहकाला बाजारमूल्यावर त्याची खरेदी करावी लागते. गॅस सिलिंडरची किंमत दर महिन्याला बदलत असते. याची किंमत नैसर्गिक वायूचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दर आणि विदेशी विनिमय दरांमधली बदल या घटकांवर अवलंबून असते.