एकाच दिवशी सव्वा पंधरा लाख लिटर दूध विक्री, पालकमंत्री, ग्रामविकास मंत्र्यांकडून व्यवस्थापनाचे अभिनंदन
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) उत्पादक व ग्राहकांचा विश्वास संपादन करून त्यांना जास्तीत जास्त लाभ करून देण्यासाठी नेहमीच प्रयत्न केलेला आहे. त्यामुळेच गोकुळच्या दररोजच्या दूध संकलनात तसेच विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. यावर्षी गोकुळने एक दिवसाच्या दूध विक्रीचा नविन उच्चांक प्रस्तापीत करतांना 15 लाख 25 हजार लिटर्स इतकी दूध विक्री केलेली आहे. अशी माहिती चेअरमन विश्वास पाटील यांनी दिली आहे.
गतवर्षी याच दिवशी म्हणजे बकरी ईदच्या दिवशी 12 लाख 62 हजार लिटर्स इतकी दूध विक्री गोकुळने एका दिवसात केलेली होती. गतवर्षीच्या तुलनेत गोकुळच्या विक्रीत जवळजवळ 2 लाख 63 हजार लिटर्स ने वाढ झालेली आहे. या कौतुकास्पद कामगिरी बद्दल पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व यांनी गोकुळ व्यवस्थानाचे अभिनंदन केले.
चेअरमन विश्वास पाटील म्हणाले, या उच्चांकामध्ये विक्रीमध्ये नविन मानदंड प्रस्तापीत करतांना गोकुळने नेहमीच चढता आलेख ठेवलेला आहे. गोकुळने दिवसाला 20 लाख लिटर्स दूध संकलन व तितकीच विक्री करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले असून हे उद्दिष्ट गोकुळ दूध उत्पादक व ग्राहकांच्या पाटबळावर साध्य करू असा विश्वास चेअरमन पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
या यशामध्ये गोकुळचे दूधउत्पादक, दूधसंस्था ग्राहक वितरक व कर्मचारी यांचे योगदान मोलाचे असल्यामुळे ते कौतुकास पात्र आहेत. म्हणून मी त्यांना संचालक मंडळाच्यावतीने धन्यवाद देतो. असे चेअरमन पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच गोकुळ परिवाराच्या वतीने मुस्लीम बांधवाना ईदच्या शुभेच्छाही दिल्या. दरम्याना पाटील यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन इदच्या शुभेच्छा दिल्या.