प्रतिनिधी / कोल्हापूर
दुधामध्ये होणारी भेसळ रोखून ग्राहकांपर्यंत उत्तम दर्जाचे आणि शुद्ध दूध पोहोचवण्यासाठी सहकार क्षेत्रातील अग्रणी ब्रँड असलेल्या गोकुळ दूध संघाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता ‘गोकुळ’चं दूध अधिक सुरक्षित पॅकिंगमध्ये उपलब्ध होणार आहे. ग्राहकांना भेसळमुक्त दूध देण्यासाठी ‘गोकुळ’ने केलेला हा प्रयत्न आहे, अशी माहिती चेअरमन विश्वास पाटील यांनी दिली. मुंबई येथे नविन पॅकिंगच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
ते म्हणाले, 1988 पासून मुंबईत ‘गोकुळ’ने आपल्या शुद्ध, सकस आणि भेसळमुक्त दुधाने एक विश्वासार्हता कमावली आहे. दर दिवशी 13 लाख लीटर दूध वितरण करतो. काही महिन्यांपासून ग्राहकांपर्यंत दूध पोहोचताना त्यात भेसळ होत असल्याच्या घटना निदर्शनास आल्या होत्या. ‘गोकुळ’ दूध उत्पादक संघाने या घटनांची गांभीर्याने नोंद घेत त्यावर त्वरित उपाययोजना केली आहे. ‘गोकुळ’चं दूध ग्राहकांपर्यंत पाच लेअर्स पॅकिंगमध्ये पोहचवणार आहे. त्यामुळे एकदा दूध पॅक झालं की, त्यात भेसळ करणं अशक्य होईल. तरीही कोणी तसा प्रयत्न केला, तरी वैशिष्ट्यपूर्ण पॅकिंगमुळे ग्राहकांनाच ते सहज लक्षात येईल.
डॉ.कुरियन यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त गोकुळच्या वतीने गायीचे दूध नवीन सिक्युरिटी पॉलीफिल्ममधून वितरीत करण्याचा शुभारंभ करण्यात आला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, संचालक अरुणकुमार डोंगळे, गायक-संगीतकार अवधूत गुप्ते, अभिनेत्री माधवी निमकर उपस्थित होते.
ग्राहकांवर बोजा पडणार नाही
गोकुळची विश्वासार्हता खूप मोठी आहे. मुंबईत दूध वितरण सुरू केलं, तेव्हापासून आतापर्यंत ग्राहकांना दर्जेदार दूध उत्पादन देण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न आहे. याच प्रयत्नांतून आम्ही ग्राहकांना भेसळमुक्त दूध देण्यासाठी ‘गोकुळ’चं पॅकिंग अधिक सुरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ग्राहकांकडून जादा पैसा आकारले जाणार नाहीत.
– विश्वास पाटील, चेअरमन गोकुळ
ग्राहकांनी भेसळ कशी ओळखावी.. गोकुळ व्यवस्थापनाकडून फुलक्रिम दुधासाठी सी.आय छपाई तंत्रज्ञानाची पाच लेअरची सिक्युरीटी फिल्म वापरली जात आहे. अधिक सुरक्षितता म्हणून या फिल्मवर बारीक अक्षरात छपाई करून आतील भाग हा निळ्या रंगाच्या फिल्मचा थर दिलेला आहे. त्यामुळे जर कुणी भेसळ करण्याचा प्रयत्न केल्यास सिल केलेल्या जागी काळसर ठिपका दिसतो. त्यामुळे ग्राहकांना भेसळ ओळखता येईल.