प्राचार्य डॉ. मनोज कामत यांचे उद्गार, पणजीत शशिकलाताई काकोडकर स्नेहमेळावा
वार्ताहर /पणजी
गोमंतक मराठा समाजातील घटकांनी सरस्वतीची, कलेची, ज्ञानाची निष्ठेने सेवा केली आहे. महात्मा फुलेंच्या तोडीचे कार्य राजाराम पैंगिणकर यांनी केले आहे. सर्जनशीलता, चिंतानशीलता, क्रीयाशीलता या समाजाने जोपासली आहे. इतर ज्ञातीतील कर्तृत्वाचाही गौरव करण्याची या समाजाची वृत्ती आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार काढून मल्लिकार्जुन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज कामत यांनी, शशिकलाताई काकोडकर यांच्यानंतर समाजप्रतीचे दायित्व, ममत्व कुठल्याही राजकारण्यात आढळले नाही,असे मत येथे व्यक्त केले.
गोमंतक मराठा समाज गोवा या संस्थेतर्फे गोव्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर यांच्या 87 व्या जयंतीनिमित्त संस्थेच्या राजाराम पैंगिणकर सभागृहात आज झालेल्या स्नेहमेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. कामत बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे मुंबईतीतील चेंबूरचे आमदार प्रकाश वैकुंठ फातर्पेकर,सन्माननीय पाहुणे उद्योजक तथा गोवा इंटरनॅशनल सेंटरचे अध्यक्ष यतिन काकोडकर, संस्थेचे सचिव मंगेश कुंडईकर, कोषाध्यक्ष श्रीकृष्ण आसकावकर व उपाध्यक्ष विनोद जांबावलीकर उपस्थित होते.
यावेळी यतिन काकोडकर यांच्या हस्ते, शशिकलाताई स्मृती उत्कृष्ट समाज कार्यकर्त्या पुरस्काराच्या मानकरी पौर्णिमा केरकर व डॉ. अनुपमा बोरकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
शशिकलाताईकडे दूरदृष्टी होती
शशिकलाताई यांचा रोखठोकपणा, करारी बाणा, शिस्तप्रियता आणि तेवढीच संवेदनशीलता, वाचनाची भूक हे गुण मला भावले. त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. त्यांना समाजाच्या कोंदणात बंदीस्त करता येणार नाही.आजच्या राजकीय स्थितीत ताईंची उणीव प्रकर्षाने जाणवते.
– डॉ. मनोज कामत
डॉ. अनुपमा म्हणाल्या, मी फार मोठं कार्य केलं असं मला वाटत नाही तेव्हा हा पुरस्काराची मला अपेक्षा नव्हती, तेव्हा हा पुरस्कार मी मला मिळालेला आशीर्वाद समजून स्वीकारते. पौर्णिमा केरकर यांनी सांगितले, की गोमंतक मराठा समाजाच्या घटकांनी अनेक क्षेत्रात ललामभूत ठरेल असे कार्य केले आहे.ताईंच्या नावाचा हा पुरस्कार मिळणे हे मी भाग्यच समजते.
अधिक काम करण्याचे बळ या पुरस्कारामुळे निश्चितच मिळेल. विस्मृतीच्या उंबरठय़ावर हे माझे सदर वाचून ताई कौतुक करायच्या व पुस्तक काढण्यासाठी आग्रही त्यानी केला होता.
मी चेंबूरचा आमदार असलो तरी महाराष्ट्रातील कामे करतो.मी कुणाचाही फोन स्वतः घेतो पीएला घ्यायला सांगत नाही .माझ्या कार्यालयाची दारे नेहमी उघडी असतात.अशी माझी कामाची पध्दत आहे. मेधा पाटकर या माझ्या मानस भगिनी .त्यांच्याकडून मी समाजकार्याची प्रेरणा घेतली. समाजाला माझी गरज पडली तर मला कधीही हाक मारावी.
मुंबईचे आमदार प्रकाश फातर्पेकर (गोमंतकीय सुपूत्र)
विविध पुरस्कारांचे मानकरी
समाजाच्या विविध पुरस्कारांच्या मानकऱयांना यावेळी आमदार फातर्पेकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यात नरेंद्र नाईक, वास्को( कै. विश्वनाथ पैंगिणकर स्मृती उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार),ज्योती रामराव नागेशकर,नागेशी (कै.निलिमा पैंगिणकर उत्कृष्ट कार्यकर्ती पुरस्कार),अविनाश रामनाथकर, रामनाथी (तातोबा वेलिंगकर स्मृती नाटय़ व कला क्षेत्रातील उत्कृष्ट पुरुष कलाकार पुरस्कार),सरोजनी लोलयेकर(अलकताई वेलिंगकर स्मृती ,नाटय़ व कला क्षेत्रातील उत्कृष्ट महिला कलाकार पुरस्कार),प्रा. दत्ता भि. नाईक(स्व. प्रमिलाबाई नारायण मराठे कारवारकर स्मृती,दीर्घ विद्यादान सेवेबद्दल सेवा सदन प्राध्यापक पुरस्कार),सन्मत्रि भरत नाईक व राजदीप सुनील फातर्पेकर(विशेष प्राविण्य विद्यार्थी पुरस्कार),महादेव विनायक नाईक(प्रगतिशील कृषी पुरस्कार),साईश अनंत नाईक(युवा नाटय़कलाकार पुरस्कार) व मिलिंद पिळगावकर(उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार) यांचा समावेश होता. तसेच उत्कृष्ट तालुका समिती प्रथम पुरस्कार- पेडणे तालुका (कै. सुधा सुभाष साळकर स्मृती पुरस्कार), द्वितीय-सांगे तालुका (कै. गिरीजाबाई व कै. शंकर गुणा नाईक स्मृती पुरस्कार), उत्कृष्ट तालुका समिती प्रथम पुरस्कार – पेडणे तालुका (कै.सुधा सुभाष साळकर स्मृती पुरस्कार), द्वितीय-सांगे तालुका(कै. गिरीजाबाई व कै. शंकर गुणा नाईक स्मृती पुरस्कार)
मंगेश कुंडईकर यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांनी समई प्रज्वलित करून मेळाव्याचे उद्घाटन केले व शशिकलातताईंच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली. सतीश पैंगीणकर व सुनील फातर्पेकर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. ऍड. हर्षा नाईक यांनी पुरस्कार प्राप्त महिलांचा परिचय करून दिला. सुनील शिवा नाईक यांनी सूत्रसंचालन केले तर लक्ष्मीकांत नाईक यांनी आभार मानले. या सोहळय़ात 2018-19 व 2019-20 या शैक्षणिक वर्षातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना यावेळी पारितोषिके प्रदान करण्यात आली.