ऑनलाईन टीम / पणजी :
गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पुन्हा एकदा ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे 13 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. मध्यरात्री 2 ते सकाळी 6 या वेळेत ही घटना घडली. या मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने कोविड रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याची कबुली गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी यापूर्वीच उच्च न्यायालयासमोर दिली आहे.
दरम्यान, ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे गोव्यात मंगळवारी 26, बुधवारी 20, गुरुवारी 15 आणि आज पहाटे 13 जण प्राणाला मुकले आहेत. तर महिनाभरात याच कारणामुळे गोव्यात 103 रुग्णांचा जीव गेल्याचे उघड झाले आहे.
गोवा सरकारने मेडिकल कॉलेजमधील ऑक्सिजन पुरवठ्याच्या प्रश्नावर समिती नियुक्ती केली आहे. यामध्ये आयआयटीचे बी.के. मिश्रा, जीएमसीचे माजी डीन व्ही.एन.जिंदर आणि तारिक थॉमस यांचा समावेश आहे. ऑक्सिजन पुरवठ्यावर ही समिती बारीक लक्ष ठेवणार आहे. तसेच येणाऱ्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे.