क्रीडामंत्री गोविंद गावडे यांची माहिती
क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
गेली कित्येक वर्ष अनेक कारणांमुळे प्रलंबित होत असलेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाला भारतीय ऑलिम्पिक संघटेनेने गोव्याला अखेर हिरवा कंदील दाखविला आहे. काल शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी आलेले पत्र सर्वांना दाखविले.
क्रीडामंत्री गावडे यांनी माजी क्रीडामंत्री फ्रान्सिस्को मोंत क्रूझ यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि आशीर्वाद मागितला. फातोर्डा आंतरराष्ट्रीय स्टेडियम विक्रमी सहा महिन्यात बांधलेल्या मोंत क्रूझ यांच्यासमोर क्रीडामंत्री गावडे नतमस्तक झाले. क्रूझ यांनी गोमंतकीय क्रीडाक्षेत्राला दिलेल्या योगदानाला गोमंतकीय कधीच विसरणार नाहीत, असे ते म्हणाले. फातोर्डा स्टेडियमवर 17 वर्षांखालील महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन होणार असून यासाठी त्यांचा आशीर्वाद मोलाचा असल्याचे क्रीडामंत्री यावेळी म्हणाले.
‘होय, आम्हाला भारतीय ऑलिम्पिक संघटनेने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा ध्वज नेण्यासाठी आमंत्रित केल्याचे यावेळी क्रीडामंत्री म्हणाले. गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन कधी होणार, यावर नेहमीच चर्चा व्हायची. मी क्रीडामंत्री पदाचा ताबा घेतल्यानंतर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाबाबत कधीच आशा सोडली नाही. क्रीडा खात्याने आपल्या कामाचा वेग वाढविला आणि आता शासनाच्या मदतीने जवळजवळ सर्व कामे पूर्ण झाल्याचे क्रीडामंत्री यावेळी म्हणाले.
येत्या डिसेंबरपर्यंत सर्व कामे पूर्ण होणार असून त्यानंतर आम्ही कुठलीही आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यास तयार असल्याचे गावडे म्हणाले. सूरतमध्ये 12 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा समारोप सोहळा होणार आहे. त्यादिवशी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा ध्वज नेण्यासाठी आम्हाला आमंत्रित केले असल्याचे यावेळी क्रीडामंत्री गावडे म्हणाले. गोव्यात 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी शासन आणि क्रीडा खाते कटीबद्ध असल्याचे ते शेवटी म्हणाले.